Showing posts with label वि. दा. सावरकर. Show all posts
Showing posts with label वि. दा. सावरकर. Show all posts

ने मजसि- वि. दा. सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला! ॥धृo||


भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता;
मज वदलासी अन्य देशिं चल जा‌उं; सृष्टिची विविधता पाहू.
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
’मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन!’
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी, मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "ये‌ईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला! ॥१॥

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी!
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें!
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला! ॥२॥


नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आ‌ईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला ॥३॥


या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा?
त्वस्वामित्वा सांप्रती जी मिरवीते, भि‌ऊनी कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी ? मज विवासनाते नेसी?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझी ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला ॥४॥


- स्वा. विनायक दामोदर सावरकर
 
Designed by Lena