Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts
Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts

जोगीण-कुसुमाग्रज

साद घालशील
तेव्हाच ये‌ईन
जितकं मागशील
तितकच दे‌ईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जा‌ईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

-कुसुमाग्रज

येणं जाणं- कुसुमाग्रज

आल्या आल्या म्हणतेस, आता
पुन्हा कधी जाणार नाही,
जाता जाता म्हणतेस, आता
पुन्हा कधी येणार नाही.
                                       येणं जाणं कुणास ठा‌ऊक
                                       घडेल कसं
                                       वार्‍यावरती तरंगणारी
                                       सारीच पिसं
नसतानाही भरपूर असतेस
एव्हढंच तुला कळणार नाही

-कुसुमाग्रज

मौन- कुसुमाग्रज

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गा‌ऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधू का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपू का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत ये‌ऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगा‌अंगातुन
होकारांचं तुफान उठलं.

-कुसुमाग्रज

प्रेम कर भिल्लासारखं -कुसुमाग्रज


पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाले तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा


मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा


शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण
इंद्रधनू बांधील काय?


उन्हाळ्यात ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महीने बा‌ई राहील झुरत
नंतर तुला लागिनचिटि
आल्याशिवाय राहील काय?


म्हणुन सांगतो जागा हो
जाण्यापुर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ


प्रेम म्हणजे वणवा हो‌उन जाळत जाण
प्रेम म्हणजे जंगल हो‌उन जळत रहाण


प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल...


शब्दांच्या या धुक्यामाद्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधालूं दे तूफ़ान सगळ काळजामाद्ये साचलेल


प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल..

-कुसुमाग्रज

पृथ्वीचे प्रेमगीत -कुसुमाग्रज

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ हो‌ऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल हो‌ऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घे‌ऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

-कुसुमाग्रज

गर्जा जयजयकार! -कुसुमाग्रज


गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!


खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
हो‌ऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन आ‌ईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आ‌ई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


कशास आ‌ई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आ‌ई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे ये‌ऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार

मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

-कुसुमाग्रज

तुफ़ान -कुसुमाग्रज


शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गा‌ऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.


शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.


शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.


शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत ये‌ऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगा‌अंगातुन
होकारांच तुफान उठलं.

-कुसुमाग्रज

कोलंबसाचे गर्वगीत -कुसुमाग्रज


हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे


ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता


की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान


पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती


सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम


काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घे‌ऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?


कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती


मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा


चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला!"

-कुसुमाग्रज

समिधाच सख्या या -कुसुमाग्रज

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य रा‌उळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली

नव पर्णाच्या या विरल मांडवाखाली,
हो‌ईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा

-कुसुमाग्रज

तळघर- कुसुमाग्रज

ती हसत होती..सैरभैर
तेव्हा त्या हास्याच्या पायरया उतरून
मी खाली गेलो..खोलवर
आणि पोहोचलो,
एका तळघराशी.

तळघर होतं सुबक
संगमरवरी
ताजमहालाच्या तळघरासारखं;
आणि तिथल्याप्रमाणे इथेही
होती एक
छोटीशी कबर
गुलाबांच्या पाकळ्यांनी झाकलेली
धुपाच्या दाट सुगंधात वेढलेली
झुलत्या दिव्यांच्या मंद प्रकाशात
संध्याकालीन पाणकमळासारखी
मिटून पडलेली
आणि मग माझ्या लक्षात आले
तिचे सैरभैर हसणे
म्हणजे एक
ताजमहालच होते.

- कुसुमाग्रज
 
Designed by Lena