Showing posts with label सदानंद रेगे. Show all posts
Showing posts with label सदानंद रेगे. Show all posts

सोहळा- सदानंद रेगे

गॉलगोथाच्या टेकाडावर

जय्यत सारे तयार आहे...

 

सारा थाट पटला आहे

सारा घाट घटला आहे


झगा झांभळा सजला आहे

क्रूसहि अधिरा बनला आहे


खिळा खिळ्याला भिडला आहे

हातोडी तडतडते आहे


किरीट कांटे खातो आहे

वरात अजुनि येणे आहे


गॉलगोथाच्या टेकाडावर

उधाण काळे वहात आहे


बाकी सगळे तयार

उणीव केवळ 'त्याची' आहे!


-सदानंद रेगे

अडगळीची खोली- सदानंद रेगे

अडगळीच्या खोलीत येते
कणीदार धूळ माहेरवासाला
वाळवीचे पांढुरके बि-हाड बरोबर घेऊन...

तपकिरी घोड्यावरचा
बिनडोळ्यांचा अंधार शोधीत असतो
फुरफुरत्या नाकपुड्यांनी
चुकचुक पालीची गुलाबी अंडी...

वाजू नये थंडी
म्हणून विणू लागलेले असतात विंचू
कोळिष्टकांचे स्वेटर...

बाजाच्या पेटीचा भाता कुरतडणा-या
बायकोला म्हणत असतो
मनुकांचे डोळे
टेलिफोनच्या डायलसारखे फिरवणारा
अलबुखारी उंदिर:
मी नाही येणार तुझ्याबरोबर सिनेमाला
अडलंय माझं खेटर!

याच खोलीत असतो
जरीची वाटोळी टोपी घातलेला
आखूड चड्डीचा ऍनेमिक ग्रुप फोटो
आजोबांनी काढलेला
त्यांच्या आजोबांबरोबर...

इथेच असतात
सद-याची हरवलेली बटने,
इथेच विचारतात ती
तोत-या झुरळांना:
भटो, भटो.. काय तुमचा मोटो?
झुरळीं पुटपुटतात:
क...क...स....ला मोटो...नि
क..सलं...का...य
आ...आम्हांला हवा आ...हे बै...दा फ्राय
देता काय?

अडगळीच्या खोलीत करते
जागता पहारा
माहेरवाशीण मातीची मंगळागौर
हव्याहव्याला येतो पूर
नको-नकोचा होतो चूर

अशी ही जगावेगळी
अडगळीची खोली...
वेडगळीची डोली...

-सदानंद रेगे

चित्र- सदानंद रेगे

तीन कावळे
तीन बगळे
पियानोचे सहा सूर
पलीकडचे ते निंबाचे झाड
अन बोगनवेलीच्या वक्षांवर
माथे टेकून
श्रांतपणे
आकाशाकडे पहात बसलेला
तो फ़ुलांचा झुबका..

पण माझ्या मनातील
हे चिनी चित्र
या खिडकीबाहेर कसे आले?

-सदानंद रेगे

दुपार- सदानंद रेगे

माथ्यावरती उन्हे चढावी,
पावलात सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या,
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या..

डोंगर व्हावे पेंगुळलेले,
पोफळबागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती,
तहानलेल्या मैना याव्या..

लुकलुकणारे गोल कवडसे,
निंबाच्या छायेत वसावे
खारीचे बावरे जोडपे,
बकुळीखाली क्षणिक दिसावे..

कुरणाच्या हिरवळीत ओल्या,
ऊन हिरवे हो‌ऊन जावे
कुठे कधीचे नांगरलेले,
शेत पावसासाठी झुरावे..

-सदानंद रेगे

लाट- सदानंद रेगे

क्षितिजावरुन
माझीया मनाच्या
अकस्मात येते
एक प्रचं लाट
अन क्षणार्धात
घेते ती कवेंत
अंबराच्या झुंबरांना

...वाटतं
असंच पडावं बाहेर
नि यावं फ़िरुन
ब्रम्हांडाच्या नाक्यावरुन!

-सदानंद रेगे

नाही- सदानंद रेगे

नाही
मला
काही
काही
करायचं
नाही
काही
म्हंजे
काहीसुद्धा
नाही

नाही
आकाश
पहायचं
नाही
चांदण्या
मोजायच्या

नाही
वारा
अंगावर घ्यायचा
नाही
पाऊस
झेलायचा

मला
उणं
व्हायचंय

मला
नेणीवेनं
निजायचंय

मला
मिटल्या अक्षरांनी
जागायचंय

मला
काही
काही
नकोय
मग हा
असा छळ
का
मांडलाहात?

शब्द
म्हणतात:
हेच लिही
हेच लिही
नि मग
काही
काही करु नको
कालत्रयी.

नुसतंच उणं
उण्यातून उणं
हातचं आलं उणं
उन्हातून
उण्म
तहानेतून
उणं
उन्हातान्हातून
उणं

-सदानंद रेगे

कविता. -सदानंद रेगे

तुझ्यावर कविता.
तुझी ओळखदेख नसताही
तुझ्यावर कविता.

म्हणून तर आज
थोडी धुगधुग आहे
आजच्यापुरता तरी.
एकतार
अन गण्याच्या सरी
लगातार..

-सदानंद रेगे

एक सिनेरियो- सदानंद रेगे

अनादि पसरलेलं वाळवंट
इथून तिथून
अथांग अंतापर्यंत..
त्या शून्यत्वाची मृगजळं
डुचमळणारी डोळियात उंटाच्या.
घंटांच्या किणकिणीचे सैराट ओहोळ
त्यांना डावं घालून
मालवणारया
मुअज्जन मिनार सावल्या..
वाळू..तापलेली, तपलेली,
मृत्यूगार, निराकार
अन वाळूतून उगवणारा तो
अकस्मात
आकाशात डोकं खुपसून बसलेला..
त्याच्या बोटांच्या फ़टींतून
घरंगळणारी झुळझुळ चंद्रकोर..

(कॅमेरा इथंच दफ़नावा
वर निगेटीव्हची चादर घालावी;
म्हणावं-द बिगिनिंग
म्हणावं-द एंड
किंवा द बिगनिंग ऑफ़ द एंड
किंवा द एंड ऑफ़ द बिगनिंग
किंवा...
पण कंस येथेच पुरा करावा)

-सदानंद रेगे

हायकू- सदानंद रेगे

एक झाड
त्याच्या प्रेमातलं
दुसरं झाड
मध्ये फक्त
न संपणारी
जमीन !

-सदानंद रेगे

दुपार-सदानंद रेगे

या ग्रंथसंग्रहालयात
नि:शब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफ़ुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली
बॉबकट केकेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटं झोपी गेलेले दिसतंय
ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईनस्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्वज्ञानाचा प्रोफ़ेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळु बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत..

बाहेर..
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली
घेऊ लागली आहे डुलक्या
अन तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे गं!
मला झोप येते आहे!

-सदानंद रेगे

रिकामटेकड्याचं एकपात्री- सदानंद रेगे

आज सगळेच कसे
आपापल्या कामात गर्क आहेत!
कुणाचं भाषण..कुणाचं भजन..
कुणाच्या हातात नवा कोरा स्वच्छ झाडू..
आज दुकानात शब्दकोशही शिल्लक नाहीत..
सारंच कसं झालंय out of print
एवढा डोंब उठलाय भंवताली
नि मी.. मी इथं बसून
करतोय काय
तर ओततोय पसापसा
प्रतिमांच्या पखाली..

-सदानंद रेगे

प्लॅटफ़ॉर्म- सदानंद रेगे

प्लॅटफॉर्म..
पिसाट पावसाने
काळाला दिलेला
क्लोरोफॉर्म..

समोरच्या तारेवरचा
तो चिंब कावळा
पावसातच सुकवतो आहे
आपली पिंजारलेली पिसे.
त्याच्या चोचीतला
जाणिवेचा थेंब
केव्हाच उडून गेला आहे.
रुळांच्या वळणावरचा
तो तांबडा सिग्नल
पावसातच पडतो आहे
सावल्यांचा नमाज.
त्याच्या काळ्या कफ़नीवरचा
नेणिवेचा डोळा
केव्हाच भिजून गेला आहे..
आहे नाहीत मिटले आहे.
काळाचे पा‌ऊल थिजले आहे.

प्लॅटफ़ॉर्मवर उरलो आहे
मीच काय तो एकटा
हा कावळा माझा नाही
हा सिग्नल माझा नाही
खिशातल्या सिगारेटचा
झाला आहे भुकटा..

या मेलेल्या काळाचे धूड कोण ने‌ईल?
कधीही न येणारी माझी गाडी
या स्टेशनात कधी ये‌ईल?

-सदानंद रेगे

बेमालूम- सदानंद रेगे

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हांला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हाला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी हो‌ऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात ....
पण कसे दोघेही फसलात !

-सदानंद रेगे

बुरशी- सदानंद रेगे

आता उरलंय काय?

एक फ़ुटकी बशी,
एक सफ़रचंदाची फ़ोड,
नि पावावरती बुरशी.

काडी पेटवली
की भिंतीवर
त्यांच्याच आकाशभर सावल्या

काळोखातही जाणवतं
बुरशी
आता फ़रशीवर चढलेय.
बुरशी अशीच चढत जाणारेय.

तेवढंच
फ़क्त
उरलंय.

-सदानंद रेगे

दडपण -सदानंद रेगे

हे आकाश
             असं दबा धरुन बसलंय केव्हापास्नं?

या ढगांचं
             प्रेत कुणीच कसं अजून उचलीत नाही?

झाडांच्या हाडांची
             तर झाली आहेत काडें

हे सगळे....
             सगळं एकदाचं कोसळत का नाही?


-सदानंद रेगे

स्वागत- सदानंद रेगे

हुकूमशहा गावात येणारय
म्हणून ही मुलं खुडून आणल्येत

कमानी, पताका, बॅंड, पोलिस;
सूर्यालाही धरुन आणलेलं ओलिस

एक केसाळ हात ढगातून उपटतो
नि मलाही गर्दीत बेमालूम ठेऊन जातो

आपोआप एकेका हातात फ़ुगे येतात;
एकेकात बावटे फ़डफ़ड करु लागतात

शिट्यांची कोल्हेकुई, पोटात वाफ़ा,
आलालल्ला हुकूमशहाचा लफ़्फ़ेदार ताफ़ा.

हुकूमशहाची नजर सहज माझ्याकडे वळते;
पॅंटीतल्या पॅंटीत मला चिरकायला होते.

-सदानंद रेगे

विदूषकाचं मरण- सदानंद रेगे

सकाळी सकाळीच
हसण्याचा आवाज आला
तेव्हाच मी ओळखलं-
वरच्या मजल्यावरचा
विदूषक आटोपला.

प्रेतयात्रा व्यवस्थित
तडक थेट बिनबोभाट
हसत हसत.

त्याच्या अश्रू-अश्रूची
राख झाली
अन आमच्या कवट्या फ़ुटल्या
तरी त्याचं हसू
काही केल्या फ़ुटेना.

विदूषकाने जाताना
हसू मागे ठेवून जावं,
हे त्याला कधी
कळलंच नाही.

-सदानंद रेगे

हवा- सदानंद रेगे

तो तिथं कोपरयावर उभा राहून
पाखरांना हाळी घालू लागला
म्हणजे हवा कशी उमदी पडते
सूर्यफ़ुलांच्या मुसळधारेसारखी..
छे, छे, एकही पाखरु नसतं त्याच्या आवाजात,
हाती फ़क्त दाणे मोतिया विश्वासाचे..
पाखरांच्या विश्वासावरच तेवढा विश्वास असतो
अन हवेचा पाखरांवर..
म्हणूनच तो तिथं कोपरयावर उभा राहून
पाखरांना हाळी देतो
तेव्हा हवा कशी देखणी असते
हवेच्या डोळ्यातील पाखरांसारखी..

-सदानंद रेगे

आत्महत्या- सदानंद रेगे

या चंद्राचं डोचकं
असं अचानक कसं फ़िरलं?
कुणालाच काही
न सांगता न सवरता
समोरच्या बर्चवर
त्यानं टांगून का घेतलं?

-सदानंद रेगे

खार- सदानंद रेगे

त्याच्याकडे काही होतं
ते त्यांना हवं होतं.
त्यांनी त्याला जंग जंग पछाडलं,
दाढीचा एकेक केस उपटला,
वृषणाला चाप लावले.
गुदद्वारी मिरच्यांची पूड घातली.
पण तो हूं की चूं करीना.
मग त्यांनी त्याला बाजारचौकात आणलं
नि सर्वासमक्ष त्याला गोळ्या घातल्या.
तो खाली कोसळला.
त्याच क्षणी त्याची जीभ
त्याच्या सदरयाच्या खिशातून खाली पडली
नि खारीसारखी तुरतुरत
झुडूपात निघून गेली
त्यांच्यासमक्ष...

-सदानंद रेगे
 
Designed by Lena