Showing posts with label बहिणाबाई. Show all posts
Showing posts with label बहिणाबाई. Show all posts

देवगाव- बहिणाबाई


देवगांव माझे माहेंर साजणी । वेरूळ तेथोनी पूर्वभागीं
देवांचा समूह सर्व जयें ठायीं । मिळालासे पाहीं देवगांवीं
हिमालयाहुनी चालिला अगस्ती । चातुर्मास्य वस्ती केलीं जेथें
तेथुनी पश्चिमें शिवनग वहात । तीर्थ हें अ तीर्थांमाजीं
लक्ष तीर्थ जेथें येउनी सर्वदा । लाक्षायणी सदा वास तेथें
तें स्थळ पवित्र देखोनी अगस्ती । अनुष्ठाना येती दिनोदयीं
वर हा दिधला ऋषी अगस्तीनें । लक्ष तीर्थें जाण लावग्रामा
स्नान-दान करी जप अनुष्ठान । सिद्धि तेथें जाण होये नरा
अगस्ती राहोनि देवगांवी जाण । शिवनदी-स्नान करी सदा
बहेणि म्हणे ऐसें स्थळ देवग्राम । तेथें माझा जन्म झाला असे

-बहिणाबाई

--

शिवनद- शिवणा नदी
लावग्राम-लाक्षाग्राम, देवग्राम

मन वढाय वढाय -बहिणाबाई

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भु‌इवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हडं एव्हडं
जस खसखसचं दान
मन केवढं केवढं
आभायतबि मावेन

देवा आस कसं मन
आस कसं रे घडल
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडल

-बहिणाबाई

अरे संसार संसार -बहिणाबाई


अरे संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मीयते भाकर

अरे संसार संसार
खोटा कधीं म्हनु नही
रा‌उळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हनु नही

अरे संसार संसार
नही रडण कुढण
येड्या, गयातला हार
म्हनु नको रे लोढण

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडामंदी कडु
बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार
म्हनु नको रे भीलावा
त्याले गोड भीमफुल
मधीं गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार
शेंग वरतुन काटॆ
अरे, वरतुन काटे
मधीं चीक्ने सागरगोटे

ऐका संसार संसार
दोन्ही जीवांचा इचार
देतो दु;खाले होकार
अन सुखाले नकार

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखा दुखाचा बेपार

अरे संसार संसार
असा मोठा जादुगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्यावरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा इसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार

-बहिणाबाई

खोप्यामधी खोपा -बहिणाबाई


अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..


पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!


सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर


खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !


तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

-बहिणाबाई

वाटच्या वाटसरा -बहिणाबाई


वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी


नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी


वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी


जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट


उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात


उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


’ माझेज भा‌ऊबंद
घा‌ईसनी येतीन !’
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान


तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव


मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट


दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती


ये‌ऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी

-बहिणाबाई

जीव देवाने -बहिणाबाई


जीव देवानं धाडला
जल्म म्हने " आला आला "
जव्हा आलं बोलावनं
मौत म्हने " गेला गेला "


दीस आला कामामधी
रात नीजमधी गेली
मरनाची नीज जाता
जलमाची जाग आली.


नही सरलं सरलं
जीवा तुझं येनं जानं
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीनं.


आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं
एका सासाचं अंतर.


येरे येरे माझ्या जीवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप.


ऐक ऐक माझ्या जीवा
पीडायेलाचं कन्हनं ?
दे रे गांजल्याले हात
त्याचं ऐक रे म्हननं.


अरे निमानतोंड्याच्या
वढ पाठीवरे धांडा
नाच नाच माझ्या जीवा
संसाराचा झालझेंडा !


हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या
तोंडावर्‍हे कायं फ़ास


जग जग माझ्या जीवा
असं जगनं तोलाचं
उच्च गगनासारखं
धरत्रीच्या रे मोलाचं !

-बहिणाबाई

पेर्ते व्हा- बहिणाबाई


पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!


पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड! 


पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!


पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी.

-बहिणाबाई

कशाले काय -बहिणाबाई


बिना कपाशिन उले
त्याले बोंड म्हनू नही
हरी नामा‌ईना बोले
त्याले तोंड म्हनू नही


नही वारयान हलल
त्याले पान म्हनू नही
नही एके हरिनाम
त्याले कान म्हनू नही


पाटा येहेरीवाचून
त्याले मया म्हनू नही
नही देवाच दर्सन
त्याले डोया म्हनू नही..


निजवते भुक्या पोटी
तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी
त्याले हात म्हनू नही


ज्याच्या मधि नाही पानी
त्याले हाय म्हनू नही
धावा ऐकून आडला
त्याले पाय म्हनू नही


येहेरीतून ये रीती
तिले मोट म्हनू नही
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनू नही


नही वळखला कान्हा
तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा
तिले माय म्हनू नही


अरे, वाटच्या दोरीले
कधी साप म्हनू नही
इके पोटच्या पोरीले,
त्याले बाप म्हनू नही


दुधावर आली बुरी
तिले साय म्हनू नही
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनू नही


इमानाले इसरला
त्याले नेक म्हनू नही
जल्मदात्याले भोवला
त्याले लेक म्हनू नही...


ज्याच्यामधी नही भाव
त्याले भक्ति म्हनू नही
ज्याच्यामधी नही चेव
त्याले शक्ति म्हनू नही!

-बहिणाबाई

माझी माय सरसोती -बहिणाबाई


माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली!


माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात सामावतं
माटीमधी उगवतं..


अरे देवाच दर्सन
झालं झालं आपसुक
हिरिदात सुर्यबापा
दाये अरूपाच रूप..


तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानामंधी
देवा तुझं येन-जान
वारा सांगे कानामंधी


फुलामधि सामावला
धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय? 


किती रंगवशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरीरंग
रंग खेये आभायात..


धर्ती मधल्या रसानं
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते!

-बहिणाबाई
 
Designed by Lena