Showing posts with label पुरुषोत्तम पाटिल. Show all posts
Showing posts with label पुरुषोत्तम पाटिल. Show all posts

विदेही- पुरुषोत्तम पाटिल

अतृप्त मिठीच्या आवेगात
तुझे दैन्य मी पाहिले नाही,
सारा विखार पचवुनही
विझवित राहिलीस कृतघ्न निखारे.
स्वागताची दाद देत राहिलीस
हसत राहिलीस, रिझवित राहिलीस
डोळ्यातल्या चंचल सुरम्यातही चिमधार करुणा होती
पुरुषी कॄरतेला अलगद झेलणारी सख्त माया
तुझ्या सुरात हातात कुठून आली?
जास्वंदीचे कृत्रिम ओठ..पण त्यातही
कुजबुजणारे इमान, प्रामाणिक थरथर..
माझ्या वासनेलाही चकीत केलेस

दु:ख बुडवण्यासाठी आलेल्या या देहातील
पश्चात्तप्त मन
तुझ्याच अबोली दु:खाने सुखेनैव विदेही झाले आहे
धन्यवाद!

-पुरुषोत्तम पाटिल

पूर- पुरुषोत्तम पाटिल

भाळावरची उद्धट बट
दोन बोटांच्या चिमटीत धरुन
अप-या नाकाच्या शेंड्यापर्यंत ताणीत
तू म्हणालीस..
ते मी ऐकलं नाही
मी फक्त पहात होतो- चित्र

झटक्यात
बटा सावरीत, कोरे नेसू आवरीत
तू उठून उभी राहिलीस
चाळवीत स्वत:ला
नव्या वस्त्राला, सळसळत..
मी पहात नव्हतो
मी फक्त ऐकत होतो- सळसळ

जाताना 
पाठमोरी वळून
भडभडून अल्लड म्हणालीस,
’ इतकी तब्येत बिघडलिये
बांनाच सांगत्ये’
मी ऐकत नव्हतो
नव्हतो पहात
फक्त वाहत होतो- पुरात.

-पुरुषोत्तम पाटिल

झरा उपसता -पुरुषोत्तम पाटिल

झरा उपसता
कवळ्या हातीं
शरीर थोडे
व्यस्त वाकले
कोरे बिलवर
होऊन ओले
खळकन किंणता
किंचीत टिचले..
खरें सांगतो
झरयात तेव्हा
आम्ही नुसतें
अमुचे केवळ
प्रतिबिंबच की
झुलत पाहिलें


-पुरुषोत्तम पाटिल

 
Designed by Lena