Showing posts with label नामदेव ढसाळ. Show all posts
Showing posts with label नामदेव ढसाळ. Show all posts

आमच्या आळीतून जाताना -नामदेव ढसाळ

हे महाग्यानी लोक
हिंडतायेत मशाली पेटवून
गल्लीबोळातून, आळीआळीतून

जेथे उंदिर उपाशी मरतात-
त्या आमच्या खोपटांतील
काळोख, म्हणे, यांना कळतो.
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर!
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माणसांना
छप्पन्न टिकली बहुचकपणा
अजूनही दाखवावा!

अरे धूर्तांनो,
ज्यांना तुमची नसननस कळलिये
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्याना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही.

मात्र एक.
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला, या खोपटां-खोपटांतून
पूर्ण सूर्य दिसतोय!

-नामदेव ढसाळ

थोडा वेळ तरी -नामदेव ढसाळ

काही माणसं असतात चारित्र्यवान
काही माणसं असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही
ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही

जिवंतपणीच नरक वाट्याला आला
मेल्यानंतरच्या स्वर्गाचं अप्रूप कशाला?
फ़ारच जीव कोंडून गेला रे-
थोडा वेळ तरी उघड गडया आकाशाची खिडकी

-नामदेव ढसाळ

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो- नामदेव ढसाळ

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
तुमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून

मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसं
चौकाचौकातून

कोरभर भाकरी  पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच
तर
आजही फ़िरवला जातो नांगर
घरादारावरुन

चिंदकातले हात सळसळलेच
तर
छाटले जातात आजही
नगरानगरातून

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत रहायचं का असंच
युद्धकैदी?

ती पहा रे ती पहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला..

आता या शहराशहराला 
आग लावत चला..

-नामदेव ढसाळ

मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे- नामदेव ढसाळ

वाल्मीकीची कार्बनकॉपी व्हायचे नव्हते मला 
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी 
बायकोला म्हणालो--’घे यातले थोडेसे वाटून’ 
तिने कानांवर हात ठेवले! 
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली 
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही 
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर 
आर्षकाव्य तरी लिहिले. 
आणि मी? 
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले. 
हे जगण्याच्या वास्तवा 
आता तुच सांग मी काय लिहू?

-नामदेव ढसाळ

कस्टडीतल्या कविता २- नामदेव ढसाळ

पकडून चारभिंतींच्या पिंजरयात मला अडकवू्न ठेवलंय
माझा गुन्हा काय ते सांगू शकत नाही मला
आणि माझं मन मुलूखगिरी करतंय
सैनिकांचा पोशाख चढवतंय
गाड्याच्या बैलाला दिली जाते मस्तवाल अंधेरी
तसे त्यांनी मला अंधारात डांबलेय
हरकत नाही:  उद्या जेव्हा बाहेर पडेल
तेव्हा त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी
माझ्याकडे बैलाचं बळ असेल

- नामदेव ढसाळ

कस्टडीतल्या कविता २- नामदेव ढसाळ

माझ्यासाठी बेल घेऊ नका बेल
किती वणवण भटकलो मी या शहरात
सावत्र आईसारख्या या शहराने मला
सावत्र आईसारखाच त्रास दिला
थंडीवारयात मला उभा केला
दोनगज जमीनदेखील मला मिळाली नाही यापूर्वी
दोस्तांनो पहिल्याप्रथम मात्र हक्काची खोली
मिळतेय जमीन मिळतेय
थांबा! मला येथे पोटभर लोळू द्या पोटभर
माझ्यासाठी बेल घेऊ नका

- नामदेव ढसाळ

शूद्राचं जीवन घेऊन- नामदेव ढसाळ

शूद्राचं जीवन घेऊन जन्माला आलो
अनायासे मुकलो सगळ्याच गोष्टींना
जे जे माझं होतं , होणार होतं माझं
त्यावर सांगू शकलो नाही पहाडी अधिकार
हक्काचा वारसदार होतो पण अनाम
ओठ शिवलेले, हात बेड्यांनी जखडलेले
गुलामीचं आयुष्य जगतानासुद्धा

पांधरया कातडीच्या माद्यांनी घातला सभोती पिंगा
उधळला अवघा श्रीरंग
स्खलित होता आलं नाही- हाही असावा शरीरनियमांचा पराभव
काळजाच्या घडास डसू लागला माझ्या
बेचाळीस पिढ्यांचा रतिमृत्यू

भावनेचा व्यापार करणारया घाऊक बाया
पैशाच्या राशीवर हुंदडणारया त्याच्या मडक्यातला
मदन हिंदकळता
त्यांच्या एकेक स्पर्शासाठी मरण तोलणारे माझे बापजादे
अतिरिक्त विरहाच्या अग्नीनं जळून शेवटी अस्पृश्य
राहिलेले, वर्गास हरवून बसलेले
ज्यांच्या घरातून विझलेले दिवे
फ़िरलेले नांगर, आजही एकोणीसशे ७४ सालातल्या
जानेवारीपर्यंत पुढे सरळ धावत राहणारे रुळांच्या
वामाचाराचे

- नामदेव ढसाळ

कडेलोट- नामदेव ढसाळ

उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य-
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही डोक्यात राख घालून घेतलिये
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही वेडाने पछाडलो आहोत
खरंच आम्ही वेडे आहोत.
आणि आम्ही स्वत:हून डोक्यात राख घालून घेतलिये
कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे..
आमच्या मनाचा कल हा मानव्याच्या सर्वकष मुक्तीचा आहे..
खरंच आम्हाला उठवलंय एका जगमान्य इच्छेने.
खरंच आम्हाला इच्छा झालीये शोषकांच्या
रक्ताने रंगलेले आमचे पंजे सन्मानाने मिरवायची.
त्यांना कसे असणार हे ठाऊक
की आमच्या डोक्यात एक सृजनाचा राक्षस आहे,
त्याला जर आम्ही काम दिलं नाही,
नाचवलं नाही तर तो आम्हालाच
खाऊ शकेल बिनदिक्कत..
आणि म्हणून उपसलेल्या तलवारीसारखे आमचे
धारदार तारुण्य-
एका नव्या जगाच्या वेडासाठी आम्ही
त्यास कड्यावरुन झोकून देत आहोत.

- नामदेव ढसाळ

व्हॅन गॉगसाठी- नामदेव ढसाळ

सूर्यफ़ुलं ही तुझ्याच
अनुभवाची अभिव्यक्ती
किती दाहक ऊन सोसलंस तू
तरीही गडया
उन्हाचा एक रंग विसरुनच
गेलास की-

- नामदेव ढसाळ

आई- नामदेव ढसाळ

आई गेली याचं दु:ख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दु:ख याचं आहे: अज्ञानाच्या घोषा आत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
गाव सोडताना ती तिथेच ठेवून आली मरीआईचा गाडा
विस्थापित होऊन बाप अगोदरच
घडकला होता शहरात
आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन
कष्ट, खस्ता उपासल्या भोगल्या
शिळ्या भाकरीचे तुकडे मोडून
तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता
तिच्या देहातली वाद्यं ही अशी झंकारत रहायची

बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता
प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वाहायचा
रक्तबंबाळ व्हायचा
चिक्कार पाहिलं-भोगलं आईनेही
शहरातही तिने तवलीत अन्न शिजवलं
पैठणीचे रंग न्याहाळता-न्याहाळ्ता
जुनेराला थिगळ लावलं
बापाअगोदर मरुन
तिनं असं अहेवपण जिंकलं
बाप अजूनही खुर्डत-खुर्डत
मरणाची वाट पाहतो आहे

आईअगोदर बाप मेला असता तरी
मला त्याचं काही वाटलं नसतं
दु:ख याचं आहे: तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले
लक्ष्मी-पूजनाला दारिद्र्य पूजलं

प्रत्येक दिवाळी ही अशी माझ्यासाठी
एक-एक पणती विझवत गेली

स्वत:च्या छोट्या विश्वाचा
उलगडा झाला नाही आईला
आभाळाकडे हात करुन ती म्हणायची
त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही
आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे
विजा का चमकतात, पाऊस का पडतो
तो सांगू पाहायचा आजीला
माझ्या येडपटा, म्हणत ती त्याच्या पाठीत
धपाटा टाकायची
बाबा, नियंत्याची अशी थट्टा करु नये म्हणायची
तिला हे जग गैबान्याची शाळा वाटायची
ती म्हणायची, पृथ्वी म्हणजे
त्याने अंथरलेली लांब चादर आहे
तिला आदि नाही, अंत नाही
ऊन-सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची

आई मेली याचं दु:ख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
अनाकलनीय-

- नामदेव ढसाळ

आयुष्याची पैरण- नामदेव ढसाळ

आयुष्य पैरणीसारखं खुंटीला टांगता आलं असतं
तर किती बरं झालं असतं

जमीन मोजत आलो पावलांनी
तरीही जगल्यासारखं वाटत नाही
जन्म एकदाच मिळतो माणसाला
नस्त्या गोष्टीत वाया जाई
चुकून आला एखादा
या हमरस्त्याने
तर त्यालाही सांग
बाबा-
मरण्याआधी जगून घे.

- नामदेव ढसाळ
 
Designed by Lena