Showing posts with label धामणस्कर. Show all posts
Showing posts with label धामणस्कर. Show all posts

परिपक्व झाडे -धामणस्कर

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय:
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही ...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत.

-धामणस्कर

पहिले ऊन- धामणस्कर

मला वाटते:
ह्या पहिल्या उन्हाला
केवड्याचा गंध आहे;
पाहिलेस ना ते सावल्यांचे नाग
लांबच लांब
नादावलेले, सुस्त, काळे..

-धामणस्कर

उन्हाचे गाणे- धामणस्कर

पाऊस संपल्यानंततरच्या स्वच्छ उन्हात
मी एक लिहीण्यापूर्वीच
ह्या चित्रविचित्र आवाजाच्या पाखरांनी
ते म्हणून टाकलेले
वर-खाली गिरक्या घेत.

- धामणस्कर

हस्तांतर- धामणस्कर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या..

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..

- धामणस्कर

झाडे सत्तेवर आली की- धामणस्कर

माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हात्पाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघ्ड्यावर रचून ठेवतात...
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोड्लेल्या माणसांची हाडे
अशीच उघ्ड्यावर रचून ठ्वतील;
व्रुक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांच सर्पण म्हणून उपयोगही करतील
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील...
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे

- धामणस्कर

त्यानंतर पाखरांनी- धामणस्कर

सूर्य उगवताना पाखरांनी
आपापल्या दिशांचे वेध घेतले त्या वेळी,
"दिवस मावळताना घरट्यात परत या",असे
आ‌ईने बजावून सांगितले.
आपली दिशा सांभाळीत.
ह्यात शिस्तीचा भाग किती होता कुणास ठा‌ऊक
पण असे नित्याने
घरट्याकडे परत येता येता
पाखरांना आपो‌आपच उमगले: परत येण्यात
आपल्या इच्छे‌इतकाच
घरट्याच्या इच्छेचाही भाग आहे..

त्यानंतर पाखरांनी आपल्या इच्छेचे
स्मरणच ठेवले नाही.
मी पाहिले: सांजवताना ती
विनासायास घरट्याकडे परतत होती.
सायासाचा सारा अधर्म लोपल्यानंतर
त्यांना भेटणार ते त्यांचेच घरटे असणार, विषयी
भोवती गडद होणार्‍या अंधारालाही शंका नव्हती.

- धामणस्कर

देठाचे स्वातंत्र्य- धामणस्कर

फ़ुलाला स्वातंत्र्य आहे कुणाच्याही
ओंजळीत झोकून द्यायचे स्वत:ला
मानायचे मनोमन की
देठाशी आपला संबंधच नव्हता..
देठाचे स्वातंत्र्य एवढेच की
वेदनेतही चेहरा
आत्म्यासारखा निर्लेप ठेवायचा;
फ़ुलाची कुणी चौकशी केली तर म्हणायचे,
"छे, छे. मी नुसता देठच;
पलिकडच्या
फ़ूल असलेल्या देठांना विचारा.."

- धामणस्कर

कोणे एके काळी- धामणस्कर

कोणे एके काळी
धगांच्या एखाद्या अस्पष्ट इशार्यावरही
माझ्या कागदी होड्या
आपले नांगर उचलून तयार असायच्या;
आणि गंमत म्हणजे
पाऊसही मग लवकर यायचा..

नंतर, ढगासारखाच हुबेहूब
आवाज काढणारे कुणी साधक भेटले,
मारीच राक्षसाची गोष्टही वाचनात आली, आणि
होड्या अधिकाधिक सावध होत गेल्या.

आता सगळ्या होडया
जणू कायमच्या किनारयाला जखडलेल्या;
खरया ढगांची सनातन हाकही
अर्थहीन होत चाललेली..

- धामणस्कर

आई- धामणस्कर

आई कधी गेली ते आठवत नाही;
सर्व आठवणी ती आल्याच्या अहेत..
पोरवयात, वर्गातील एका मुलाला मजेत
इजा केली पेन्सिलच्या तीक्ष्ण टोकाने तर
मुलगा कळवळताना ती
माझ्या डोळ्यांतून व्यथितशी आली ही तिची
पहिली आठवण..

नंतर आली ती माझ्या तरुण
ओढगस्तीच्या महिनाअखेरीस
मित्राकडे निघालो असताना, आणि पावले
माघारी वळली. अपरिहार्यपणे
काही दिवस पायीच कामावर गेलो
नुसताच वरणभात खाल्ला, खात्यावर आणलेल्या
बटाटयांच्या भाजीबरोबर जेव्हा ती
परत आली, कौतुकाने पाहतच राहिली..

शिकवण्या करायचा त्या प्रदीर्घ दिनान्ती
लोकलचे रूळ घाईघाईने ओलांडताना, ती
मागून यायची. सगळे विश्वच कृपावंत वाटायचे..

आता जरा सुखाचे दिवस आल्यावरही
ती येते क्वचित एखादा याचक
विन्मुख मागे वळताना,
घरात येऊ पाहणारया चिमण्यांना
संकोच वाटताना,
घराचा उंबरठा स्वागतास
कधी उणा पडताना..

.. अशा तिच्या आठवणी फ़क्त ती येण्याच्या.
ती कधी गेली हे, खरं म्हणजे, मला
माहीतच नाही.

- धामणस्कर

बरेच काही उगवून आलेले..- धामणस्कर

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले..

- धामणस्कर

ज्ञानी माणसानं- धामणस्कर

आत्यंतिक प्रेम करावं असं काही
कुणाला आढळलं की नेमकं
उध्वस्त करणारच काही त्याला
सापडलेलं आहे हे सत्य
निष्पाप माणसाला सांगायच नाही असा
ज्ञानी माणसानं निर्धार करायचा
आणि असाही की जे अटळच आहे ते
आपल्यामुळे लवकर न येतो,
जे अटळच आहे त्याला
पूर्वतयारीशिवाय
निर्णायकपणे भिडण्याची कुणाची संधी
लांबणीवर न पडो...
ज्ञानी होण्याची सनद
इतरानांही मिळो -
जळत जळत सारे त्यांना(ही)
कळत जावो...

- धामणस्कर

प्राक्तनाचे संदर्भ- धामणस्कर

पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्या‌इतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.
त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात, तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस.

- धामणस्कर

साधना- धामणस्कर

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे....तरीही पक्षी
कुठल्या पा‌इपला‌ईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही...

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही.

- धामणस्कर

निरोप घेताना..- धामणस्कर

डोक्यावरचा
कधीही कोसळू पाहणारया पावसाचा धाक
तिच्या लक्षात येण्यापूर्वीच मी तिचा
निरोप घेतला तेव्हा ती
सहजपणाने म्हणाली, "येताना
मी बरोबर होते;
जाताना एकट्याला
कंटाळा ये‌ईल, नाही?"
"छे ग मी तसा
एकटा असतच नाही : येताना
तू बरोबर होतीस, जाताना
पा‌ऊस!" निर्णायकपणे मी. तर
काही नेमके कळल्यासारखे तिचे डोळे
भरुन आलेले-
माझी हिंस्रता मला
कमालीची विलोभनीय वाटू लागलेली. . .

- धामणस्कर

प्राक्तनाचे संदर्भ- धामणस्कर


पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्या‌इतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणा-या झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.
त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात, तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस.

- धामणस्कर

अनंताचे फ़ूल- धामणस्कर

तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्याही अंगणात अनंताचे
झाड आहे, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.
नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो.

-धामणस्कर
 
Designed by Lena