Showing posts with label आरती प्रभू. Show all posts
Showing posts with label आरती प्रभू. Show all posts

हांसायचे आहे मला- आरती प्रभू

 कसें? कसें हांसायचे?

हांसायचे आहे मला,

हांसतच वेड्या जिवा

थोपटीत थोपटीत

फुंकायचा आहे दिवा...


हांसायचे

कुठें? कुठें आणि केंव्हा?

कसें? आणि कुणापास?

इथें भोळ्या कळ्यांनाही

आंसवांचा येतो वास...


-आरती प्रभू

भारवाही- आरती प्रभू

भारवाही म्हणून चालताना
विचार करु नये
भार कशाचा वाहतोय त्याचा
सगळा भार वाहून नेताना
एखाद्या गवताच्या हिरव्यागार पात्याला
विचारावं, "तू कसा वाकतोस?"
आणि पहाटेच्या प्रहराला,
उत्तरासाठी हात पुढे करावा त्याच्यासमोर.
हाताच्या तळव्यावर पडेल एक दंवबिंदू नम्रपणे
तीर्थासारखा..
खूप आहे खूप आहे हा दंवबिंदू
प्रेमस्वरुप..
सगळा भार वाहून नेताना.

-आरती प्रभू

दिवेलागण-आरती प्रभू

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरल्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल,
विलग पंखांचे मिटते मन
एखाद्या प्राणाचे विजनपण,
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण

गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां,
प्राजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण,
एखाद्या प्राणाची मल्हार धून

एखाद्या प्राणाचे सन‌ईसूर,
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण.

-आरती प्रभू

शोध- आरती प्रभू

पृथ्वीची फिरती कडा चाटून
कवितेची ओळ येते
आणि आयुष्यातील एक दिवस
दानासारखा मागून नेते.


स्वत:पासून दूर जाता येते
आरशापर्यंत तेवढेच
हे शरीर आयुष्याने बांधलेले
त्या सूत्रालाही अदृश्य खेच

उभा जन्म पाठीमागचा उगाच
सूर्योदयाचा डोंगर वाटतो
पण संपूर्ण कवितेच्या शोधातील
तोही एक सूर्यास्तच असतो

-आरती प्रभू

तू-आरती प्रभू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची.

-आरती प्रभू

श्रद्धांजली- आरती प्रभू

या वर्षांतील ही प्रथमच कविता.
नि:शब्द
प्रत्येक झाड, त्यावरील पक्षी,
लाल शेंदरी वळण,
पायठसे, पाचोळासुद्धा.
उभाच्या उभा माणूस या मातीचा
गमावल्यावर
माती नि:शब्द.
गमावलाय माझाच एक माणूस:
गमावलेला तोही नि:शब्द.
दिसतोय फ़क्त त्याच्या हरहुन्नरी ओठांवर
टपोर मोगरयानंतरचा हास्यमंद्र.
या वर्षांतील ही एक प्रथम कविता,
जी तो वाचणारही नाही;
पण नि:शब्द मध्यरात्रीला
टपोर हास्यमंद्र समेवर येताना
कदाचित उघडेल आपोआप ही वही.

-आरती प्रभू

विळखे- आरती प्रभू

काल तू नव्हतीस,
आज तू आहेस,
उद्या तू
असणार असशील होत्या-नव्हत्याच्या लाटांवरील संधिप्रकाश.
नैवेद्य मागणारा काळ
अक्राळविक्राळ,
उपाशी
तरीसुद्धा कळ्या गिळणारी एक पाशवी समर्थ असोशी :
तिची सोनेरी छटा मुक्त कचपाशावरील.
सन‌ईच्या सुरावटीतील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन
तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर, त्यांतील धुक्याचे कुसुंबी क्षण
विषमय नव्हेत तरीसुद्धा
बेहद्द उद्दाम :
त्या डोळ्यांनी तू केलेली बदनामीही बदामी असते;
अद्दल घडलेले घडे फुटूनसुद्धा भरलेले असतात;
चक्कर देणारे भोंगळ बहाणेही ससाणे होतात;
वाटायला लागतें की आम्ही कोण तुझ्यापुढे ?
दु:खाचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस
तेव्हा सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात,
सापडतात विचित्र आकार लहरी हवेला
आणि निर्झरांच्या सोनसाखळ्या उस्कटून पडतात रानोमाळ,
भासमान होतात मंद्रसप्तकाचे जन्म-आदिकाल,
झाडांचे बुंधे समंधांसारखे रात्री खातात ओरबाडून
आणि मातीच्या कणाकणांतून कळे धरतात गेलेले पावसाळे.
हें छप्पर खरेंच आहे
पण त्याखालचे आधार अंधारस्तंभांसारखे विळखे देतात.
काल तूं नव्हतीस ?
खरें नव्हे. आज तूं आहेस ? खरें नव्हे.
उद्या असणार ? खरें नव्हे.
फक्त तो एक शिल्पकार खरा ज्याने वाऱ्याला दिले
झाडाझुडपांचे स्पर्श, विळखे.

-आरती प्रभू


सप्रेम द्या निरोप- आरती प्रभू

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे


गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोग-याचा पानी मिटून आहे


अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे


जा‌ईजु‌ई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे


वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे


वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे


बोले अखेरचे तो: आलो इथे रिकामा
"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"

- आरती प्रभू

कविता- आरती प्रभू

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो - कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील,
कराल?


माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा.


या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून,
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.


मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.

- आरती प्रभू

हट्ट- आरती प्रभू

तूं तरी किती हट्टी आहेस?
खिडकीवरचा पडदा लोटून
पापण्यांची लवलव मालवून
एका थरथरत्या वातीचा हुंदका
उरांत दडपून उभी आहेस
तूं तरी किती हट्टी आहेस!

तंग झाल्या तारेवरचा कंप जरा झडूं दे
कंप सुटून कीट झडून फ़ुलें लखलख पडूं दे..

- आरती प्रभू

ये रे घना- आरती प्रभू

ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना

फ़ुलें माझीं
अळूमाळू
वारा बघें
चुरगळूं

नको नको
म्हणतांना
गंध गेला
रानावना

टाकुनिया
घरदार
नाचणार
नाचणार

नको नको
म्हणताना
मनमोर
भर राना

नको नको
किती म्हणू
वाजणार
दूर वेणु

बोलावतो
सोसाट्याचा
वारा मला
रसपाना

ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना

-आरती प्रभू

नुस्तीं नुस्तीं राहतात- आरती प्रभू

प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणें गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो

गाणें गातात
देणें देतात
झडून जातात
उडून जातात
झाडें नुस्तीं नुस्तीं उभी राहतात.

- आरती प्रभू

दोन पोक्त पानं- आरती प्रभू

दोन पोक्त पानं:
एक पिवळंगार, दुसरं हिरवंधम्मक,
बाजूबाजूला. दोघांचे देठ एकत्र  थेट.
एकावरल्या रेघा
दुसरं वाचतंय; स्वत:च्या रेघांमधून पसरतंय
पहिल्याच्या अंगात.
दोनच ती. इतरांतही अशी एकत्र दोन कित्येक.
वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा.
पिवळ्या उन्हात पोपटी पानं..
पोक्त झाड उभंच्या उभं.

- आरती प्रभू

नक्षत्रांचे देणे- आरती प्रभू

गेलें द्यायचें राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या
आणि थोडी ओलीं पानें

आलो होतो हासत मी
काही श्वासासाठी फ़क्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.

- आरती प्रभू

लक्ष लक्ष वेळ- आरती प्रभू

लक्ष लक्ष तूं
अन लक्ष लक्ष वेळ
मी एक अनंताचा चुकला कुणी

लक्ष लक्ष वेळ
तुला रिकामीच पाठवावें,
लक्ष लक्ष वेळ
तुला आठवावें, साठवावें..

मिठी पडतांच तुझी
तुझ्याहून दूर व्हावे;
कुण्या बाहुलीचे दु:ख
तुझ्या डोळ्यात रचावें

पहाटेच्या कळ्यांपाशी
थोडे मागावे इमान,
थोडें सांगावें तुलाही
माझ्या मनाचें प्रमाण..

लक्ष लक्ष तू
अन
लक्ष लक्ष वेळ,
मी एक अनंताचे चुकले पाऊल.

- आरती प्रभू

स्वगत- आरती प्रभू

एका रिमझिम गावी
भरुन आहे
हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जाता आलं पाहिजे
चालून जाता येण्यासारखी
पायतलीं आहे माती
पण
जाणें न जाणें तरी
कुणाच्या हाती?

- आरती प्रभू
 
Designed by Lena