Showing posts with label विलास सारंग. Show all posts
Showing posts with label विलास सारंग. Show all posts

स्पर्श- विलास सारंग


रोममधल्या सेंट पीटरच्या पुतळ्याचा
डावा पाय
झडलेला- महारोग झाल्यासारखा
हजारो भाविकांनी स्पर्शून.

शिकागोच्या ’आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ला
हुआन मीरोचा ’सूर्यपक्षी’--
हिरवट तांब्याचा,
एका गोलसर पंखाचं टोक
झालेलं चकचकीत तांबूस,
हजारो प्रेक्षकांनी स्पर्शून.

-विलास सारंग

--

होआन मिरो या चित्रकार, शिल्पकार आणि आणखीनही बरेच काही असलेल्या प्रतिभावान स्पॅनिश कलाकाराने १९६६मध्ये ब्रॉन्झमध्ये घडवलेले ’पाहारो सोलार’अर्थात ’सोलर बर्ड’ अर्थात ’सूर्यपक्षी’ हे शिल्प वाचकांच्या संदर्भाकरिता: (छायाचित्र सौजन्य: www.yelp.com, Photos of San Diego Museum of Art - San Diego, CA) मोठ्या आकारातले छायाचित्र पाहण्याकरता त्यावर क्लिक करा.



आणि  सारंग म्हणतायेत तो सेंट पीटरचा, ज्याच्या पायाचं चुंबन घेतल्याने तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तो, आर्नोल्फो दि काम्बियोने ब्रॉन्झमध्ये घडवलेला पुतळाआणि त्याचा पाय:(छायाचित्र सौजन्य: https://twoyeartrip.com)
पुतळा हाच असेल तर, सारंग म्हणतायेत तो भाविकांची चुंबनं रिसीव करुन जवळपास वितळत आलेला पाय हा उजवा पाय आहे, सारंग डावा पाय का म्हणतायेत, ते न कळे.

परदेशातून परदेशात- विलास सारंग


प्रतिबिंबाचं प्रतिबिंब पडावं; तसा
इथे चकचकीत येऊन पडलो
बदललेल्या कोनामधून
शिलगावलेली अंतरं अजमावीत

पोतड्यांमधून संस्कृती
सरावानं काढून मांडली:
राजस्थानी बाहुली हस्तिदंती हत्ती
चढवली इथल्या भिंतींवर
काली आणि गणेशाची निधर्मी पोस्टरं
(भिंती सारख्याच असतात
कुठंही गेलं तरी)

नकाशातलं आणखी एक टिंब
पसरतं आहे टिपकागदावर

मनावर
नव्या तपशिलाची नक्षी
आभाळात
जेटची जबर इच्छाशक्ती

-विलास सारंग

जाणारे दिवस- विलास सारंग


सकाळची पहिली
सर्वात सुंदर सिगरेट
मग खोलीत येरझारा
पण सगळ्या पाकिटांमधल्या सगळ्या सिगरेटी
शुष्क, कोरड्या होऊन गेल्या आहेत
य रुक्ष, उष्ण प्रदेशात:
भुरभुर जळतात कापरासारख्या
घसा अधिकच कोरडा करीत.
कुणीतरी सांगितलं होतं
सिगरेटच्या पाकिटाच्या आत ठेवावं
एक ताजं, हिरवं पान,
म्हणजे सिगरेटींमध्ये ओलावा कायम राहतो.
पण इथं तर
मैल-मैल चालत गेलं कुठल्याही दिशेनं
तरी, ताजं, हिरवं पान आढळणार नाही.

येरझारा.
न वाजणा-या टेलिफोनकडे अधूनमधून पाहत
येरझारा.
अधूनमधून खिडकीतून बाहेर पाहत.
भगभगीत उन्हात
भेगाळलेली क्षारयुक्त जमीन
इथं-तिथं सुकल्या पानाच्या जागी
क्षाराचे पांढुरके पापुद्रे.

संध्याकाळी सूर्य कलल्यावर
हायवेवरुन फेरफटका.
क्वचित जाणा-या एखाद्या ट्र्कविना
दुसरं काही, दुसरं कुणी नाही.
हायवेवरचे दिवे मात्र
एव्हानाच लावून ठेवलेले आहेत,
समोरच्या संधिप्रकाशात
निळसर दिव्यांच्या रांगा
कशा निस्तेज, विचित्र भासतात
अर्थशून्य प्रकाशाच्या रांगा
अवास्तव, अतिवास्तव.

रात्री उष्ण बिछान्यावर पडून
निश्चेष्ट ऐकतो
टेलिफोनची वायर
उंदिर कुरतडत असलेला,
स्वप्नात वा प्रत्यक्षात.

-विलास सारंग

कविता- विलास सारंग

१.
तो टाईपरायटरवर टकटक करत बसतो
                                 जणू एखाद्या दारावर
                                 कधी न उघडणा-या
                                हे आहे एक प्रकारचं
                                     कॉंबिनेशन लॉक
फ़क्त अक्षरं बरोबर जुळायला हवीत
                       काय उपयोग त्याला सांगून
                    की टाईपरायटरच्या चाव्यांनी
                                दारं उघडत नसतात

२.
खोलीत शब्दांची गर्दी माजली आहे
हिचकॉकच्या पिक्चरमधल्या पक्ष्याप्रमाणे
दरवाजाची जीभ चिकटली आहे टाळ्याला

बोटांना स्पर्श जाणवत नाहीसं झालंय
हा महान रोग जडल्यापासून
दिव्याचा पिवळा प्रकाश
गरगरतो पंख्याबरोबर
झडून गेलेली पेन्सिल टेबलावर

मी कोरी वही उघडतो
आणि ओळीच्या गजातून बाहेर पडतो

३.
एकशेआठ रामायणं घडली तरी
अंत नाही
पुन:पुन्हा तीच रिळं!
शब्दसंपत्ती!

शब्दांना अर्थाची पर्वा नसते
शब्दांची पावलं उलटी पडतात
शब्दाने शब्द वाढतो
कवित्व सरलं तरी शब्द मागे उरतात

-विलास सारंग
 
Designed by Lena