Showing posts with label पु.शि.रेगे. Show all posts
Showing posts with label पु.शि.रेगे. Show all posts

तू हवीस यात न पाप - पु. शि. रेगे

तू हवीस यात न पाप
पण हवी असताना
नसावीस तू
नकोस तू, नाहीस तू
छे, छे, पापच तू
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू हवीस यात समर्थन
तू हवी असण्याचे
पण हवी असताना
कशास तू? का तू? तूच का?
छे छे, माझी न तू
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू हवीस यातच परिपूर्ती
तू हवी असण्याची
पण हवी असताना
नव्हतीस तू, नव्हतो मी, नव्हते काहीच.
छे, छे, असेल कधी का असेल?
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू नुस्ते बघताना,
हे मज कळे आपाप.

तू हवीस यात न पाप

तिला हवा - पु. शि. रेगे

तिला हवा होता
साळुंकी वाऱ्याचा
लाज-भिऊ शेला
आणि पुन्हा
अडवणाऱ्या खोडीच्या पावसाची
धनंतर बरसात्
मी केव्हाचे दिले आहेत म्हणून
माझे श्वास, उच्छवास
वाऱ्याला.

लिलीची फुलें - पु. शि. रेगे

लिलीची फुलें
तिनें एकदा
चुंबित डोळां
पाणी मी पाहिलें..

लिलीची फुलें
आतां, कधीहि
पाहतां, डोळां
पाणी हें साकळें

गंधरेखा- पु. शि. रेगे

एक आहे झाड माझे
राठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासी परंतू
लाख येती ज्या शलाका.

झाड माझे लाल ज्याला
आग्रहाची लाख पाने;
आणि माझी बंडखोरी
घोषतो मी गात गाणे.

झाड माझे लाखमोली
लाल ज्याला फक्त पाने,
नेणता ये एक त्याला
शुभ्र काही जीवघेणे.

एक, ज्याला जाणीवेच्या
लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतो मी ज्यात माझे
झाड, माझ्या आणाभाका.

- पु.शि. रेगे.

उरलेले सुरलेले राहिले नव्हते तेव्हाची ही गोष्ट - पु. शि. रेगे


उरलेले सुरलेले राहिले नव्हते तेव्हाची ही गोष्ट,
ओष्ठांनी सांगतां येईल येवढीच:
कांसवांच्या आसवांना एकदां आला महापूर
मूर लोकांच्या उजाड लोकप्रिय प्रदेशांत
पहिल्यानें वहिले लोक झपाझप तरुन गेले
मेले ते साहजिकच तरुन- न गेलेले. आतां कुणी तरी
अलबत्याने गलबतांची सोय करायला हवी होती:
मोतीं नव्हती का सामुद्रधुनीतून काढलीं जात?
पण शहाणपण लहानपणींच टळतें;
कळतें ते नंतर दुसरेंच कांहीं:
म्हणणारे अजूनही म्हणतात चमत्कारीक फ़रकानें,
तर्काने यांत कांहीं सुधारणा झाली असती.

-पु. शि. रेगे

दर्शन-पु.शि.रेगे

आणि अचानक
सगळे कसे होते
अगदी तसेच
त्या वेळचेच

वळणावळणातून
डोकावणारी हिरवळ,
उनाड पाकोळ्या,
आळसावलेले दगड,
आपल्यातच गुरफटलेली
ऊनभटक झाडे,
मधेच फ़ुरफ़ुरणारा वारा,
कुठून तरी
त्याला साद देणारा
तो दूरचा कवडा.
सगळे कसे अगदी तसेच
- माझ्यासकट.
आणि
मी हे पाहणारा
त्या मला
-त्यांच्यासकट.

-पु. शि. रेगे

पक्षी जे झाडावर गाणे गातो -पु.शि.रेगे

पक्षी जे झाडावर गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
पक्षी जे झाडावर गातो

झाडावर जे गाणे पक्षी गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा
झाडावर जे पक्षी गातो.


-पु.शि.रेगे

आपण दोघे -पु.शि.रेगे

माझाच नव्हे मी तू नसताना;
नव्हे तोच मी तू असताही.
मी कोण.. कोण तू कसे कळावे?
आपण दोघे दोघे नाही..


-पु.शि.रेगे

बोलणे. -पु.शि.रेगे

तू बोलत नाहीस
..
..
..
त्यातून मी एक अलाहिदा अर्थ काढला

त्याचीच ही गाणी झाली,
काही कहाण्या,
एक-दोन अनोळखी संवाद,
अर्धेमुर्धे दर्शन..

मग मला समजले
हेच तुझे बोलणे होते..
सहज मनमोकळे,
पहाटेच्या अरुवारीचे.


-पु.शि.रेगे

तीन शब्द -पु.शि.रेगे

मी जे कधीच बोललो नाही
त्याचे झाले तीन शब्द-
एक माझा, एक तुझा, एक कुणाचाच नाही.

जो कुणाचाच नव्हता
त्याला मी आता पढवले आहेत तीन शब्द-
एक तुझा, एक माझा, एक कुणाचाही.


-पु.शि.रेगे

परकियेने.. -पु.शि.रेगे

फ़ुलले फ़ुलले त्याचें
तेज महुरले
आकाशावर भान बिंबले

बीजास्तव एका
वृक्षा वाढला
नांव तयाचे नंद जाहले.

जें परिमळ-लोभें
रान लोटलें
सहज हरवुनी लुटलें गेलें

अजिं दिशा-दिशांचा
कोष मोडुनि
परकियेने घट फ़िरवियले.


-पु.शि.रेगे

अर्थ- पु.शि.रेगे

आणि बसल्यावर
तिचा हात हातात घेताना
अंतर कधी मोजू नकोस.
काळाची एक भलतीच सवय आहे,
पुन्हा मागे फ़िरण्याची..
केवळ दूर मावळतीकडे पहा,
ढगांच्याही सावल्या रंगीत झालेल्या दिसतील..
काही विचारु नकोस, सांगू नकोस.
खाली किसलेली वाळू आहे,
तिच्यातूनही बोट फ़िरु देत.
...इथून आता सारया प्रश्नांना अर्थ आहे.

-पु.शि.रेगे

लंपट ओले वस्त्र होऊनी- पु.शि.रेगे

लंपट ओले वस्त्र होऊनी
अंग अंग तव लिंपून घ्यावे.
हुळहुळणारे वस्त्र रेशमी
होऊन वर वर घोटाळावे.

भुईवर निखळून नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे;
पहाट होता पश्मिन्याची
शाल होऊनी तुज छपवावे.

-पु.शि.रेगे

पुष्कळा- पु.शि.रेगे

पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन,
पुष्कळातली पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी.

बघताना किती डोळे पुष्कळ तुझे,
देताना पुष-पुष्कळ ओठ,
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ ऊर,

पुष्कळाच तू, पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी.

-पु.शि.रेगे

पहिल्यांदाच- पु.शि.रेगे

आणि शब्दाचा आधार तुटला होता
तेव्हा पहिल्यांदाच 
मी तिच्याशी बोललो
-अखेरचे, परोपरीचे

अगदी एका क्षणापूर्वी
शब्दाच उमटला नसता
डोळ्यांची वाट मोकळी झाली असती
आणि ते तसेच
तिच्या मांडीत उसवले गेले असते.
पण अचानक एकापुढे एक
त्यांचे वर्ण उभे राहिले
-नाही चतुराई, नाही खळखळ-
चार चौकशा,
आल्यागेल्यांची चुटपुटती नातीं,
लपेटलेली प्रावरणे,
-त्यांतच एक चुकलेला मी,
हरवलेली ती,
आणि पुन्हा पुन्हा भिडणारा
तो अनाग्रही काळ,
ज्याला भूत ना भविष्य

बोलणे झाले तें शब्दाचे
-मी काहीच बोललो नाही

तू बोललीस तरी का?

-पु.शि.रेगे

अभिलाषा- पु.शि.रेगे

अभिलाषाच जर दु:ख झाली
तर तिच्यातून नंतर अलगणार-या दु:खाचे
नवीन नाव काय
मी एक विषाचा समुद्रच रिता केला आहे
सगळ्याच दु:खांना आटवायला
-आधीच्या, नंतरच्या.
उरले आहे ते एक रेताड मन
रित्या समुद्रापलीकडची तुझी हाक,
त्या हाकेचा निरस्त आकार.

-पु.शि.रेगे

त्रिधा राधा- पु.शि.रेगे

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा


-पु.शि.रेगे

शिल्प- पु.शि.रेगे

जे सांगायचे 
ते हवे कसे अगदी घट्ट 
बांधेसूद्; 
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द, 
खुंट्या पिरगाळून 
जागच्या जागी सुतंत्र 
टांगलेला; 
एकंदर ठाण कसे अगदी 
वास्तुशिल्पित. 
पण मध्येच 
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात, 
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली 
नक्षी वेल्हाळते, 
वार्‍याची पताका चित्रावते, 
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते 
- मनासारखी. 
शब्दांना 
पटत नाही आपली पहिली ओळख. 
ते बिथरतात 
भलत्याच खुंट्या धरून बसतात्; 
म्हणतात : 
आम्हाला एक नवी भाषा 
घालून द्या. 
मी म्हणतो : हो, हो; 
उगाच त्यांना चुचकारीत.


-पु.शि.रेगे
 
Designed by Lena