Showing posts with label ना.धों.महानोर. Show all posts
Showing posts with label ना.धों.महानोर. Show all posts

अजिंठा - ८

हत्तीवरून 

अजिंठा गावाला गिलचं जाणं येणं 

थकणं. कधी कित्येक दिवस 

तिथेच झोपडी बांधून राहणं.

सावरखेड लेणापूरची मोलकरी मानसं साथीला.

दिवाबत्ती माशालीसाठी. कागद कुंचल्यासाठी .

त्याचं खाणंपिणं मांस शिजवण्यासाठी. 

कळत नसलेलं गाणं नाचणं

शेकोटी  पेटवून रात्री अजिंठ्याच्या 

डोंगरदरीत छोट्या झोपडीत ऐश्वर्यात 

न कळणाऱ्या अनोख्या बोलीत 

अडाणी माणसांच्या जगात 

मेजर रॉबर्ट गिल 

आता फक्त चित्रकार गिलसाब.

माणसांचा आदब निजामी नजाकतीतला.

लाजवाब

हळूवार 

अजनबी बोलीतला.

बोली कळत नाही नीट 

तरी माणसांना समजतं

समजून घेणारी नवी 

अबलख बोली अजिंठ्यात.

नवी रंगशाळा 

अजिंठ्यातल्या हिरव्या पसाऱ्यात.

अजिंठा - ७

पाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात 

प्रतिबिंब 

काळ्याभोर गर्द पहाडाचं.

लेण्यांचं.

त्याचे  डोळे अधीर उत्सुक 

बेहद्द धावाधाव पावलांची.

दहा पाच माणसांची.

बोली नीट कळत नाही 

तरी समजून सगळ्या 

असल्या नसल्याची 

सवयीनं हळूहळू सोबत लोकांची.

तबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून 

पहिल्या दरबारात लेण्याच्या 

तो विरघळून जातो पूर्णाकार.

गर्भगळीत त्याच्या शरीरातल्या 

शक्तीचा सगळा पारा निथळून पडतो 

तो पुन्हापुन्हा छिन्नीतल्या 

दवी रेषांवर दगडांच्या 

नजर टाकून पाहतो.

रंगांचे आवर्त. प्रभामंडळातले 

पुष्पमाला घेतलेले गंधर्व 

ओठांवर मुलायम लालसर रंग 

गोंदणारी शृंगारातली सकवार बाई 

शिबी राजाच्या गोष्टी.

गौतमाच्या पूर्वजन्मीच्या 

जातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.

राजवाड्याचे दालन 

कुठल्या रंगाचे आरेखन

त्याचे  डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.

गिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.

पद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या 

मूर्तीजवळ थांबतो 

मान उंचावून टकटक पाहतो 

सुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो

नि:शब्द 

आपण काय पाहतोय त्याला कळत नाही

क्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड 

भिंतीजवळ घ्यायला सांगतो.


मी  जगातला एक श्रेष्ठ चित्रकार.

त्याच्या अहंतेचा अंधार निथळून पडतो सरकन

तो  अबोल 

अधीर कित्येक दिवस.

सत्तावीस लेण्यांमधून 

भणंग भटकताना.

हाताला कांहीच सामर्थ्य नसल्यागत.

एकाकी.

त्याचे तरारलेले डोळे 

पुन्हा बहरून येतात 

कागदावर हळूहळू रेषा उमटतात

आपोआप रंग ओले होत जातात.

अजिंठा - ६

पक्ष्यांचे  दूरवर उडून जाणारे थवे पठारावर 

झिरकत झुलणारं काळ्या पहाडातलं 

पांढरंशुभ्र पाणी.

पाण्याच्या  वळणांचा पांढराशुभ्र प्रवाह दुरचा

बारादरीतला घुमणारा आवाज 

वाघुरच्या धबधब्यात.

पुढच्या नदीतली निस्सीम शांतता 

प्रतिबिंबित झालेली अजिंठ्यात 

त्याच्या अथांग डोळ्यांच्या पापण्यात.

दूरच्या दरीतला घुमटणारा आवाज 

मोरांच्या स्वरांचा 

त्याचा पडसाद उमटत जाणारा 

अजिंठ्यातून दूरवर.....दरीदरीतून 

गिलच्या डोळ्यांसमोर मोरणी 

निळ्या जांभळ्या रंगांची.

पिसा-यातली. थुईथुई पावलांची.

झुलत्या झाडांच्या रांगा 

वरती भरगच्च भरलेलं आभाळ.

हत्तीवरून उतरताना 

वाघुरच्या पाण्यात 

गिलचे पाय आपोआप 

नाचू लागतात.

वाघुरच्या पाण्यात.

अजिंठा - ५

अजिंठा 

पारूच्या पिवळ्या शुभ्र फुलांचा 

फुलांच्या भारानं निस्सीम बहरलेला 

कुठे विस्कटलेला 

अजिंठा

पारूच्या  गर्भार डोळ्यांतला 

अजिंठा 

चिरकाल फत्तरातला.


सराई कोटातल्या बंदिस्त कडेकोट 

गेटमधून दरबारी दिमाखात हत्ती 

मंद पावलांचा 

बारादरीतल्या पाऊलवाटेनं अजिंठ्यात 

पुन्हा एकदा बुद्धाला सामोरा जाणारा. 

कित्येक हजार वर्षांनी साक्षात 

जातक कथांमधला. मलूल डोळ्यांचा 

दहापाच लोकांच्या सोबतीनं गिलसाब 

हत्तीवरून जाणारा.चिलखती छाताडाचा.

गोराभुरा तरणा. निळ्या डोळ्यांचा.

कुंचल्यांचा झुबका 

हजार रंगांच्या तबकड्या 

कागद पेन्सिलींच्या गाठोड्यात 

मेजर रॉबर्ट गिल 

त्याचे लखलख डोळे 

अथांग निळाईत आभाळाच्या. 

निळ्याभोर पहाडात अजिंठ्याच्या.

अजिंठा - ४

अजिंठा  

जगाचे अहंकार मोडून बसलेला 

नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे 

ह्या निर्मितीतल्या.

इथल्या दगडातल्या सृष्टीला 

पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा 

एक बलशाली हात 

रॉबर्ट गिलचा.

चिलखती छाताडाच्या निळ्या डोळ्यांतला 

एक राजवर्खी झरोखा कुंचल्यांवर रंगांच्या 

जगभर युरोपच्या कानाकोपऱ्यात 

द्वाही घुमवणारा, अजिंठ्यातली .

त्याच्या  राजवर्खी कुंचल्यातल्या 

नाजूक बोटांना 

डोळ्यांना 

डोळ्यांतील नितळ समुद्राला 

चेतवून नेणारी एक अबलख पारू.

अजिंठा - ३

 अजिंठा 

अदभूत भव्य दिव्य स्वप्नातला 

प्रतिभावंतांच्या छिन्नीछिन्नीतला

जगड्व्याळ  चिरंतन नाजूक रेषांमधला 

रंगाचं आभाळ साठवून दगडांवर 

कभिन्न कातळातलं दु:ख 

घोटवून निर्यमक बुद्धाच्या कहाणीत 

शांत सचेतन 

पद्मासनातल्या गाभाऱ्यातला .

अजिंठा - २

अजिंठा  

निर्मळ वाघूरच्या प्रवाहात 

काठाकाठातला 

झाडांच्या देठातला

रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला.

अजिंठा 

झाडांच्या झुलत्या प्रवाही गाण्यातला 

लेणापूर फरीदापूरच्या गावंढळ गर्तेतला.

बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा 

पिवळ्याजर्द शेतातल्या पिकातलं बारादरीतला 

काळ्याभोर दगडातला धबधबा झेलणारा.

अजिंठा - १

डोळ्यांना  डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या 

कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या 

गाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्थ संवेदना 

बुद्धाच्या पडसावूलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा 

छंद घोटाळती ओठी- ना.धों.महानोर

छंद घोटाळती ओठी
नाचणभिंगरी
त्याच्या साध्या ओळीसुध्दा
झपाटती भारी

डोक्यावर हिंदळता
देह झाला गाणी
एका कवीच्या डोळ्यांची
डोळ्यांना माळणी

असे कसे डोळे त्याचे
मीही नवेपणी
मेंदी‌ओले हात दिले
त्याला खुळ्यावाणी

तेव्हापासूनचे मन
असेच छांदिष्ट
सये तुला सांगू नये
अशी एक गोष्ट:

त्याच्या ओळी माझ्या ओठी
रुंजी घालू आल्या
रानपाखरासारश्या
तळ्यात बुडाल्या.

-ना.धों.महानोर

पक्ष्यांचे लक्ष थवे- ना.धों.महानोर

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
      वार्‍यावर
      गंधभार
      भरलेले ओचे,
      झाडांतुन 
      लदबदले
      बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.

-ना.धों. महानोर

ती- ना.धों. महानोर

पाण्यात गोठल्या छाया, काठावर स्तब्ध निवांत
गुडघाभर पाण्यावरती, घुटमळे शेंदरी झाक.

ती लगबग सावरताना
मांड्यात घोळ कवळून
अन नितळ नितळ अंगांचे
पाण्यात सांडले ऊन्ह.

झाडांना फ़ुटले डोळे, मावे न रुप डोळ्यांत
मांड्यात घोळ कवळून ती स्तब्ध उभी ऐन्यात.

-ना.धों.महानोर

जरा


जरा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले


रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले


जरा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पा‌ऊल चुकले


अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !

डोळे-ना.धों.महानोर

डोळे भलतेच बोलके
शब्दांआधी बोलू येती
तिचे मोरणीचे मन
अंग आषाढभरती


काही बोलू नये तिशी
नुस्ते डोळ्यांशी बुडावे
आणि बेसावधपणी
उभे आभाळ झेलावे!

-ना.धों.महानोर

ह्या शेताने- ना. धों. महानोर

- ह्या शेताने लळा लाविला असा असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो.
आता तर जा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.

- ना. धों. महानोर

तिला उन्हाची- ना. धों. महानोर

तिला उन्हाची दीठ लागली
म्हणून ती कोमेजून बसली झाडाखाली
- झाडही बेटे रसिक असे की
पानांनी कुरवाळीत बसले तिचिया गाली.

- ना. धों. महानोर

झाकड पडली, थांबू नकोस - ना. धों. महानोर

झाकड पडली, थांबू नकोस
ओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस
आधीच तर तू सकवार फ़ार
चिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी
त्यात,
या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत
तुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
- थांबू नकोस!

- ना. धों. महानोर

हिर्व्या पानांत पानांत -ना. धों. महानोर

हिर्व्या पानांत पानांत काही चावळ चालते
भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते
शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते
आणि साळीचे उगाच अंग शहारुन येते
पोटरयांतल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते
केळ कातीव रुपाची छाया पाण्यात शोधते

हिर्व्या पानांत पानांत काही चावळ चालते
कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते.

-ना. धों. महानोर
 
Designed by Lena