Showing posts with label मलिका अमर शेख. Show all posts
Showing posts with label मलिका अमर शेख. Show all posts

वाळूचा प्रियकर- मलिका अमर शेख


माझ्या स्वप्नांचं घरटं शाबूत ठेवणारं
एकही झाड उरलं नाही
किती बरं वर्षं झाली...?
माझ्या तारुण्याचं रेशमी वस्त्र चोचीत घेऊन
माझा प्रियकर केव्हाच उडून गेला..

-मलिका अमर शेख
(’मला उध्वस्त व्हायचंय’ मधून)

. - मलिका अमर शेख

अनाघ्रात असं नस्तंय काहीही
हे ठीकच आहे
पण मात्र या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय?

-मलिका अमर शेख

प्रत्येक बाई -मलिका अमर शेख

प्रत्येक बाई कोरून जाते क्रूरपणे
तुमच्या त्वचेवर
तुमच्या आकाशावर
स्वत:चं लखलखतं स्त्रीत्व
न सारेच पुरूष अस्खलित अशिक्षित होतात
स्त्रीत्वाची गूढ लिपी वाचता वाचता!

- मलिका अमर शेख

एक वडाचे झाड -मलिका अमर शेख

एक वडाचे झाड चिमुकले, एक दिवाणा चिमणा
चोचीमध्ये घरटे होते, घरटयामध्ये एक शहाणा
एक शहाणा बसला होता, विणत नदीची गती
काठावरती आले काही गोजिरवाणे हत्ती
एक कहाणी ठुमकत ठुमकत पाणी भराया आली
शहाणा झाला वेडा, त्याची कुंठित झाली मती
वीणही सुटली, धागे सुटले चुकता तोल जरासा
घागरीत त्या अडकून बसला शहाणा झाल मासा
घागर घेऊन निघून गेली गोष्ट जरा सावळी
पाऊलवाटा मिटल्या विरल्या रात्र उरे जांभळी
चकित झाला चिमणा आणि वटवट करते नदी
सारे सोडून निघून जाणे जमले नाही कधी
काठावरले झाड वडाचे, हसले पानांत
कुण्यावेळच्या कुठल्या गोष्टी सांगे कानात.


-मलिका अमर शेख

तू तलम अग्नीची पात..- मलिका अमर शेख

तू तलम अग्नीची पात, जशी दिन रात जळावी मंद
तू बंध-मुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद
तू तलम अग्नीची पात..

लडिवाळ बटा गुलजार छटा, तू मृदमायेचा हात
तो तंग चंद्र अन् हले पालवी, शीतल संथ जळात
ही मखमालीची शेज सखे, अन् जळते दाहक अंग
ही रात चांदणी कोरत जाते, प्रणयामधले रंग
तू तलम अग्नीची पात..

तू अल्लड नवथर थरथर देही, जसे थरथरे पाणी
त्या पाण्यावरला तरंग मी, अन् भास वेगळा राणी
रानात बहर अंगात जहर, अन धुंदफ़ुंद ते श्वास
मिलनी मग्न ते सर्प जसे की टाकतात निश्वास
तू तलम अग्नीची पात..

या अवघड वेळी नकोच बोलू, तव ओठांची भाषा
या रानालाही कळते अपुल्या डोऴ्यामधली भाषा
असे असावे जीवन आणि असे जुळावे नाते
ही रात असावी गात स्वरांनी तुझे नि माझे गाणे
तू तलम अग्नीची पात..


-मलिका अमर शेख

व्हीनस- मलिका अमर शेख

तिला नाहीयत हात
माझ्यासारखे
न नजरही ठार मेलेली
ती उभीय शोकेसमध्ये स्तब्ध गोठून
माझ्यासारखीच
संस्कृतीचं दगडी वस्त्रं
तिनं घट्ट धरलंय पायात कसंबसं
न दगडी ओठ
घट्ट मिटलेत
माझ्याप्रमाणंच
शहरातल्या बायका वितळतायत
घडतायत व्हीनसच्या मूर्तीत
एक आदिम स्त्री
पाषाण आरोळी ठोकते
आणि शहर कोसळून पडतं
तिच्या पायाजवळ
आभाळ विस्कळीत.

-मलिका अमर शेख
 
Designed by Lena