घरटयात फ़डफ़डे गडद निळे आभाळ
फ़ांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ
कानावर आली अनंतातुनी हाक
विसरूनि पंख पाखरु उडाले एक
पश्चिमेस कलला निळ्या पुलाचा खांब
ओघळले त्यावर नक्षत्रांचे थेंब
त्या पुलाखालुनी गेले उदंड पाणी
अन वाहुनि गेली अज्ञानातील गाणी
माळावर इथेच उजाड विहिरीआड
वार्धक्य पांघरुन बसले वेडे झाड
एकदाच गेली सुगंधी वाट इथून
निष्पर्ण मनाला डोळे फ़ुटले आठ
हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
या विदूषकाला नाही रडाया वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ
भेटणार नाही, शपथ नको तू घालू
डोळ्यांत कोंडला श्वास, नको तू बोलू
जा घरी सांग लाजून जराशी नीट
जाताना चुकली पाणवठ्याची वाट
संपेल कधी ही शोधायची हाव
फ़ोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रूत भिजावी विझताना ही ज्योत
आरशात पाहती कोण कुणाचे रुप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरुप
बघ गेला पारा फ़ुटला आरसा जाड
दिसले रे दिसले, ’अरुप’ आरशाआड
दाटल्या गोठल्या विस्मरणाच्या नाड्या
धवती रुळावर त्याच त्याच त्या गाडया
ती शिटी, तो दिवा, सिग्नल पडतो तोच
जखम तीच, त्यावर माशा बसल्या त्याच
देणार काय मी सूर्य उद्या जर आला
मागेल मला दे पाणी आंघोळीला
कोरड्या किनारी फ़िरे कल्पना वेडी
मृगजळात रुतली तिची बिचारी होडी
हा ग्रंथ फ़ाटला उरले मधले पान
ते अपूर्ण होते की, उरले विस्मरण
ती दोनच पाने: पहिले अन शेवटचे
राहिले शेवटी तसेच वाचायचे
मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहीली
पाण्यात परंतु ओवी वाहुनि गेली
जरी काच तडकली वात जळे आतील
मी जाईन जेथे चंद्र-सूर्य येतील
मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन) मौनाची फुटली अधरावरती लाही
वाजली शिटी अन हलली दख्खन राणी
वाजली शिटी अन हलले काजळ पाणी
वाजली कंकणे, पदर जरासा हलला
ओठावर हिरवा तीळ जरा विरघळला
शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले
संपली वही मोडले टोक टाकाचे
लिहीशील किती रे स्पंदनक्षण श्वासांचे
घे हात उशाला खुशाल दे ताणून
देईल कोण तुज स्वप्न तुझे आणून
गेलीस समोरुन आडवी वाट करुन
गर्दीतुन बघशी पुन्हा पुन्हा का वळुन
ठेवून उरी पिचलेली हिरवी काच
भिरभिरली स्वप्ने सप्तपदीवर पाच
का सतार तुटता उठतो वाजवणारा
अन ओल खुणाही थेऊनि गेल्या गारा
बघ चाफ़ा सुकला मावळला तो गंध
दे सोडुनि वेड्या शोधायचा छंद
थकलास तुडवुनी निवडुंगाचे रान
का वळून बघशी असे तुझे का कोण
दे दगड उशाला पांघर काळी माती
ह्या जमल्या मुंग्या शोकगीत गाती
जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फ़ेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फ़सवी खोटी
ही जुनीच माती नवी बाहुली व्याली
अन जुनेच कुंपण, नवी मेंढरे आली
या जुन्या नव्यावर कुणी बांधला पूल
या जुन्याच वाटा नवे उमटले पाऊल
ही भूक शिकविते मागायाला भीक
अन भीती म्हणते गळा काढुनि भुंक
भूक आणि भीती देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणी अज्ञाताची
या इथेच पडलो होतो काल पिऊन
या इथेच पडले एक विलक्षण स्वप्न
पाहून रिकामे मद्याचे ते पात्र
उतरून पायरया धावत आली रात्र
जे आहे येथे तेच खरे रे एक
जे नाही येथे नसे कुणा ठाऊक
स्मृति म्हणजे जगणे, विस्मृति म्हणजे मरणे
मी प्यालो म्हणुनि सुचले हे बडबडणे
मी कोण? कोठला? कुठे मला जायाचे?
का एकच गाणे हेच तुला गायाचे
ते जुने प्रश्न आणि जुनाच त्यांचा वाण
प्राचीन तिरडीला नव्या सुतळीचा ताण
मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी
आभाळ एकटे आहे त्याला साक्षी
पण कुणी दिले हे आभाळाला पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख
का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फ़िरतो कोष मध्यबिंदूचा
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला
एकटा परंतु गर्दीतील मी एक
गर्दीत चिरडले गेले माझे दु:ख
एकटा आज मी निर्जन एकांतात
द्या परत मला हो, हवे मला ते दु:ख
विसरावे ऐसे जवळ असावे काही
मुक्त हस्त द्यावे असे असावे काही
गाळावे अश्रू दु:ख असावे खोल
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहित नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझे होते
ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फ़ळाफ़ुलांचे असते या धरतीला
ऋण फ़ेडायचे राहुन माझे गेले
ऋण फ़ेडायाला पुन: पाहिजे मेले
कोरुन शिळेवर जन्ममृत्यूची वार्ता
जा ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास त्याचे स्मरण
ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्मशानातली यात्रा
खांद्यावर घेऊनि शव फ़िरतो जन्म
राखेंत अश्रुला फ़ोटला हिरवा कोंब
-रॉय किणीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
अप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम रचना......प्रचंड ताकतीच्या रुबाया....मराठी साहित्यातील एक मानदंड....
ReplyDeleteअप्रतिम !
ReplyDeleteअप्रतिम !
ReplyDeleteअप्रतिम , राॅय किणीकर
ReplyDeleteआतपर्यंत स्पर्श करतील अशी रचना....... अप्रतिम.....
ReplyDelete