आई कधी गेली ते आठवत नाही;
सर्व आठवणी ती आल्याच्या अहेत..
पोरवयात, वर्गातील एका मुलाला मजेत
इजा केली पेन्सिलच्या तीक्ष्ण टोकाने तर
मुलगा कळवळताना ती
माझ्या डोळ्यांतून व्यथितशी आली ही तिची
पहिली आठवण..
नंतर आली ती माझ्या तरुण
ओढगस्तीच्या महिनाअखेरीस
मित्राकडे निघालो असताना, आणि पावले
माघारी वळली. अपरिहार्यपणे
काही दिवस पायीच कामावर गेलो
नुसताच वरणभात खाल्ला, खात्यावर आणलेल्या
बटाटयांच्या भाजीबरोबर जेव्हा ती
परत आली, कौतुकाने पाहतच राहिली..
शिकवण्या करायचा त्या प्रदीर्घ दिनान्ती
लोकलचे रूळ घाईघाईने ओलांडताना, ती
मागून यायची. सगळे विश्वच कृपावंत वाटायचे..
आता जरा सुखाचे दिवस आल्यावरही
ती येते क्वचित एखादा याचक
विन्मुख मागे वळताना,
घरात येऊ पाहणारया चिमण्यांना
संकोच वाटताना,
घराचा उंबरठा स्वागतास
कधी उणा पडताना..
.. अशा तिच्या आठवणी फ़क्त ती येण्याच्या.
ती कधी गेली हे, खरं म्हणजे, मला
माहीतच नाही.
- धामणस्कर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment