जीव देवाने -बहिणाबाई
जीव देवानं धाडला
जल्म म्हने " आला आला "
जव्हा आलं बोलावनं
मौत म्हने " गेला गेला "
दीस आला कामामधी
रात नीजमधी गेली
मरनाची नीज जाता
जलमाची जाग आली.
नही सरलं सरलं
जीवा तुझं येनं जानं
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीनं.
आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं
एका सासाचं अंतर.
येरे येरे माझ्या जीवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप.
ऐक ऐक माझ्या जीवा
पीडायेलाचं कन्हनं ?
दे रे गांजल्याले हात
त्याचं ऐक रे म्हननं.
अरे निमानतोंड्याच्या
वढ पाठीवरे धांडा
नाच नाच माझ्या जीवा
संसाराचा झालझेंडा !
हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या
तोंडावर्हे कायं फ़ास
जग जग माझ्या जीवा
असं जगनं तोलाचं
उच्च गगनासारखं
धरत्रीच्या रे मोलाचं !
-बहिणाबाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment