माझी माय सरसोती -बहिणाबाई
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली!
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात सामावतं
माटीमधी उगवतं..
अरे देवाच दर्सन
झालं झालं आपसुक
हिरिदात सुर्यबापा
दाये अरूपाच रूप..
तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानामंधी
देवा तुझं येन-जान
वारा सांगे कानामंधी
फुलामधि सामावला
धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?
किती रंगवशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरीरंग
रंग खेये आभायात..
धर्ती मधल्या रसानं
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते!
-बहिणाबाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment