सुमित्राच्या कविता- सौमित्र

एखादी अनोळखी व्यक्ती ’मला ओळखते’
असं सांगते येऊन तेव्हा
मी फ़क्त हसून स्वागत करतो तिचं..
पण जेव्हा
माझ्या कविता
मलाच म्हणून दाखवते जीव ओतून,
तेव्हा..
ओळखीच्या माणसाहूनही
जवळची वाटू लागते ती व्यक्ती.
पूर्वी..
अनोळखी व्यक्तीच्या तोंडी
’तुझं’ नाव ऐकलं की
मला तसंच वाटायचं..
पण आता
कुठल्याही व्यक्तीच्या तोंडून
तुझं नाव ऐकताना
माझ्यात काहीच होत नाही उलथापालथ
मला येत नाही राग
वाटत नाही मत्सर
नाही वाटत प्रेम, आपुलकी..
मला काहीच वाटत नाही त्या व्यक्तीबद्दल
मी उदास होत नाही
मला एकटं वाटत नाही
मी फ़क्त चालत जातो मिळेल तो रस्ता..
तुझ्या-माझ्या संबंधांबद्दल आता
मी फ़क्त एवढंच बोलू शकतो..

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena