त्यानंतर पाखरांनी- धामणस्कर

सूर्य उगवताना पाखरांनी
आपापल्या दिशांचे वेध घेतले त्या वेळी,
"दिवस मावळताना घरट्यात परत या",असे
आ‌ईने बजावून सांगितले.
आपली दिशा सांभाळीत.
ह्यात शिस्तीचा भाग किती होता कुणास ठा‌ऊक
पण असे नित्याने
घरट्याकडे परत येता येता
पाखरांना आपो‌आपच उमगले: परत येण्यात
आपल्या इच्छे‌इतकाच
घरट्याच्या इच्छेचाही भाग आहे..

त्यानंतर पाखरांनी आपल्या इच्छेचे
स्मरणच ठेवले नाही.
मी पाहिले: सांजवताना ती
विनासायास घरट्याकडे परतत होती.
सायासाचा सारा अधर्म लोपल्यानंतर
त्यांना भेटणार ते त्यांचेच घरटे असणार, विषयी
भोवती गडद होणार्‍या अंधारालाही शंका नव्हती.

- धामणस्कर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates