वाटच्या वाटसरा -बहिणाबाई


वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी


नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी


वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी


जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट


उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात


उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


’ माझेज भा‌ऊबंद
घा‌ईसनी येतीन !’
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान


तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव


मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट


दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती


ये‌ऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी

-बहिणाबाई

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates