मैत्रिणी- शांता शेळके

कुठूनशी आलीस
अवचित समोर उभी ठाकलीस
आणि माझ्या गळ्यात हात टाकलेस
तुझे ओठ हसत होते
पण डोळे बारकाईने माझा वेध घेत होते

मी माझ्या एकाकीपणात गुरफ़टून गेलेली
खिन्न, उदास, काहीशी भांबावलेली
आणि माझ्याभोवती एक दुर्भेद्य कोष तयार
झालेला..
तो भेदून तू कधी माझ्यापाशी पोचलीस
कळलेही नाही
मग तुझ्या तुफ़ान गप्पा, पोरकट विनोद
माझे अंग घुसळीत स्वत:च खदखदून हसणे
-जणू मधले काही घडूनच गेले नव्हते
माझ्या मनाचे बंद कवाड
तू हलकेच उघडलेस

माझ्या दु:खाला स्पर्श न करता
भोवती भोवती फ़िरुन
मूकपणे त्याला कुरवाळलेस, गोंजारलेस.

सारा दिवस तुझा स्पर्श, तुझा हर्ष
तुझा परिहास, सुखद सहवास
आणि भूमिगत प्रवाहासारखे त्याआडून
झिरपणारे
ओलावा देणारे तुझे सांत्वन-
निरोप देताना क्षणभर हुंदका दाटला
तो हुंदका तुझा की माझा होता?
अजूनही कळलेच नाही..

-शांता शेळके

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena