एस्टीच्या स्टॅंडवर

एस्टीच्या स्टॅंडवर मला काहीच कळेनासं होतं.
बाया असोत वा बसी, इथं चढाय-उतरायचे नियम
काय आहेत तेच कळत नाही: उष्ट्या पाण्यात
नाममात्र विसळलेल्या कपांतला घोटभर चहा
सिगरेटींनी सोसलेल्या घशाला चाटून आत जातो:
बोचकी, थैल्या, प्लॅस्टीकच्या पिशव्या, पत्र्याच्या ट्रंका
यांतून भरभरुन गावोगाव नियमित जातात
माणसांची चरित्रं, हे कळतं. कळतही नाही.
पंप मारुन फ़ुगवलेल्या टायरांचं राजकारण
रस्तोरस्ती पंक्चर होताच हातोहात
तंबाखू चोळत बसतो मख्ख इतिहास:
रातोरात कुटुंब उद्ध्वस्त होतात:
देशोधडीला लागतात खच्ची जनावरांचे कळप.
न्हात्याधुत्या पोरींच्या तासाभरात रांडा बनतात
तिशीतच म्हातारपण येतं बहुतेकांना.

तरी बरं: वर्षा सहामहिन्यांपून एखादवेळेलाच
व्याख्यानाच्या निमित्ताने दिसतात मला
महाराष्ट्राची अप्रतिम ठिगळं, धसत्या जुनेरी
शिवण उसवलेली माणसं, त्यांच्यातल्या चिंध्या.

कसली पॉव्हर्टी लाईन काढताय राव  रेखीव?
ह्या गिचमिडीतून जाणारं तुमचं संख्याशास्त्र
नव्या कोरया ऍंबेसेडर गाडीसारखं भरधाव.
बरेचसे रस्ते अजून माणसांजवळूनही जात नाहीत

माझा अप्रामाणिकपणा एकच: की मी
अमेरिकेत स्थायिक होऊन हा सगळा कॉंट्रास्ट
कंट्रोलमध्ये ठेवत नाही. किंवा मी बसत नाही
पश्चिम युरोपातल्या निवांत बसगाड्यांमध्ये.

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena