एक सिनेरियो- सदानंद रेगे

अनादि पसरलेलं वाळवंट
इथून तिथून
अथांग अंतापर्यंत..
त्या शून्यत्वाची मृगजळं
डुचमळणारी डोळियात उंटाच्या.
घंटांच्या किणकिणीचे सैराट ओहोळ
त्यांना डावं घालून
मालवणारया
मुअज्जन मिनार सावल्या..
वाळू..तापलेली, तपलेली,
मृत्यूगार, निराकार
अन वाळूतून उगवणारा तो
अकस्मात
आकाशात डोकं खुपसून बसलेला..
त्याच्या बोटांच्या फ़टींतून
घरंगळणारी झुळझुळ चंद्रकोर..

(कॅमेरा इथंच दफ़नावा
वर निगेटीव्हची चादर घालावी;
म्हणावं-द बिगिनिंग
म्हणावं-द एंड
किंवा द बिगनिंग ऑफ़ द एंड
किंवा द एंड ऑफ़ द बिगनिंग
किंवा...
पण कंस येथेच पुरा करावा)

-सदानंद रेगे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena