चाफ्याच्या झाडा-पद्मा गोळे

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाहि उरलं आता मनात.
पानांचा हिरवा,फुलांचा पांढरा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनांत;
केसात राखडी, पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनांत

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
नको ना रे पाणी डोळ्यात आणू;
ओळख़ीच्या सुरांत, ओळखीच्या तालांत
हदग्याची गाणी नको म्हणू.

तुझ्या आळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलेय ना?
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात फ़िरलेय ना?

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
पानांत, मनांत खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठे तरि दुखतंय:
तुलाही कळतंय, कळतंय ना?

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना?
कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं;
फुलांनी ओंजळ भरलीय ना?

-पद्मा गोळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates