अडसर - कृ. ब. निकुंब

 निघता जाया - लगबगिने तू उठुनि, घातलास

गौर, सकङ्कण तव बाहूचा अडसर दारास


सङ्कोचुन थबकलो न कळता, गोड सम्भ्रमात

"याल पुन्हा कधि?"  -दरवळला तो सुवास शब्दांत


अखेर येता निरोप घेऊन, निवान्त मार्गात-

ते कङ्कण, ते शब्द निघाले करित मला साथ


-शिरी फुले माळुन तारांची लाजुनिया रात

धुन्द सुगन्धी गुम्फित होती गर्द निळे गीत,


मोगरिचे मृदू अडसर होते क्षितिजा अडवीत,

चालत मी - परि थबकत होती पुन्हा पुन्हा वाट!

औदुंबर - बालकवी

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन

निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.


चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.


पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणाxमधुन चालली काळ्या डोहाकडे,


झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर,

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.

गंध - इंदिरा संत

हिरव्याशा गवतांत

हळदिवी फुलें,

हलकेंच केसरांत

दूध भरू आलें.


उभ्या उभ्या शेतांमधें

सर कोसळली

केवड्याची सोनफडा

गंधें ओथंबली.


बकुळीच्या आसपास

गंधवती माती,

उस्कटून रानपक्षी

कांही शोधिताती.

 
Designed by Lena