आई- नामदेव ढसाळ

आई गेली याचं दु:ख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दु:ख याचं आहे: अज्ञानाच्या घोषा आत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
गाव सोडताना ती तिथेच ठेवून आली मरीआईचा गाडा
विस्थापित होऊन बाप अगोदरच
घडकला होता शहरात
आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन
कष्ट, खस्ता उपासल्या भोगल्या
शिळ्या भाकरीचे तुकडे मोडून
तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता
तिच्या देहातली वाद्यं ही अशी झंकारत रहायची

बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता
प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वाहायचा
रक्तबंबाळ व्हायचा
चिक्कार पाहिलं-भोगलं आईनेही
शहरातही तिने तवलीत अन्न शिजवलं
पैठणीचे रंग न्याहाळता-न्याहाळ्ता
जुनेराला थिगळ लावलं
बापाअगोदर मरुन
तिनं असं अहेवपण जिंकलं
बाप अजूनही खुर्डत-खुर्डत
मरणाची वाट पाहतो आहे

आईअगोदर बाप मेला असता तरी
मला त्याचं काही वाटलं नसतं
दु:ख याचं आहे: तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले
लक्ष्मी-पूजनाला दारिद्र्य पूजलं

प्रत्येक दिवाळी ही अशी माझ्यासाठी
एक-एक पणती विझवत गेली

स्वत:च्या छोट्या विश्वाचा
उलगडा झाला नाही आईला
आभाळाकडे हात करुन ती म्हणायची
त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही
आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे
विजा का चमकतात, पाऊस का पडतो
तो सांगू पाहायचा आजीला
माझ्या येडपटा, म्हणत ती त्याच्या पाठीत
धपाटा टाकायची
बाबा, नियंत्याची अशी थट्टा करु नये म्हणायची
तिला हे जग गैबान्याची शाळा वाटायची
ती म्हणायची, पृथ्वी म्हणजे
त्याने अंथरलेली लांब चादर आहे
तिला आदि नाही, अंत नाही
ऊन-सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची

आई मेली याचं दु:ख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
अनाकलनीय-

- नामदेव ढसाळ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates