रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो- नामदेव ढसाळ

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
तुमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून

मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसं
चौकाचौकातून

कोरभर भाकरी  पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच
तर
आजही फ़िरवला जातो नांगर
घरादारावरुन

चिंदकातले हात सळसळलेच
तर
छाटले जातात आजही
नगरानगरातून

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत रहायचं का असंच
युद्धकैदी?

ती पहा रे ती पहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला..

आता या शहराशहराला 
आग लावत चला..

-नामदेव ढसाळ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates