कशाले काय -बहिणाबाई
बिना कपाशिन उले
त्याले बोंड म्हनू नही
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनू नही
नही वारयान हलल
त्याले पान म्हनू नही
नही एके हरिनाम
त्याले कान म्हनू नही
पाटा येहेरीवाचून
त्याले मया म्हनू नही
नही देवाच दर्सन
त्याले डोया म्हनू नही..
निजवते भुक्या पोटी
तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी
त्याले हात म्हनू नही
ज्याच्या मधि नाही पानी
त्याले हाय म्हनू नही
धावा ऐकून आडला
त्याले पाय म्हनू नही
येहेरीतून ये रीती
तिले मोट म्हनू नही
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनू नही
नही वळखला कान्हा
तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा
तिले माय म्हनू नही
अरे, वाटच्या दोरीले
कधी साप म्हनू नही
इके पोटच्या पोरीले,
त्याले बाप म्हनू नही
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनू नही
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनू नही
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनू नही
जल्मदात्याले भोवला
त्याले लेक म्हनू नही...
ज्याच्यामधी नही भाव
त्याले भक्ति म्हनू नही
ज्याच्यामधी नही चेव
त्याले शक्ति म्हनू नही!
-बहिणाबाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
खरचं बहिणाबाईंच्या कविता खूप खूप छान आहेत .....
ReplyDeleteमला असे वाटते कि आपल्या महाराष्ट्राला आता अशा बहिनाबींची सक्त गरज आहे...