जपानी रमलाची रात्र


तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात


रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड


अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया


धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री


तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला


अन म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ


जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी


तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल


करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले


अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ


स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा


गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी


पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे


आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज


नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र


कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते


गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ


डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी


तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता


आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates