कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने हो‌उन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena