शूद्राचं जीवन घेऊन- नामदेव ढसाळ

शूद्राचं जीवन घेऊन जन्माला आलो
अनायासे मुकलो सगळ्याच गोष्टींना
जे जे माझं होतं , होणार होतं माझं
त्यावर सांगू शकलो नाही पहाडी अधिकार
हक्काचा वारसदार होतो पण अनाम
ओठ शिवलेले, हात बेड्यांनी जखडलेले
गुलामीचं आयुष्य जगतानासुद्धा

पांधरया कातडीच्या माद्यांनी घातला सभोती पिंगा
उधळला अवघा श्रीरंग
स्खलित होता आलं नाही- हाही असावा शरीरनियमांचा पराभव
काळजाच्या घडास डसू लागला माझ्या
बेचाळीस पिढ्यांचा रतिमृत्यू

भावनेचा व्यापार करणारया घाऊक बाया
पैशाच्या राशीवर हुंदडणारया त्याच्या मडक्यातला
मदन हिंदकळता
त्यांच्या एकेक स्पर्शासाठी मरण तोलणारे माझे बापजादे
अतिरिक्त विरहाच्या अग्नीनं जळून शेवटी अस्पृश्य
राहिलेले, वर्गास हरवून बसलेले
ज्यांच्या घरातून विझलेले दिवे
फ़िरलेले नांगर, आजही एकोणीसशे ७४ सालातल्या
जानेवारीपर्यंत पुढे सरळ धावत राहणारे रुळांच्या
वामाचाराचे

- नामदेव ढसाळ

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena