अरे संसार संसार -बहिणाबाई


अरे संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मीयते भाकर

अरे संसार संसार
खोटा कधीं म्हनु नही
रा‌उळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हनु नही

अरे संसार संसार
नही रडण कुढण
येड्या, गयातला हार
म्हनु नको रे लोढण

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडामंदी कडु
बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार
म्हनु नको रे भीलावा
त्याले गोड भीमफुल
मधीं गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार
शेंग वरतुन काटॆ
अरे, वरतुन काटे
मधीं चीक्ने सागरगोटे

ऐका संसार संसार
दोन्ही जीवांचा इचार
देतो दु;खाले होकार
अन सुखाले नकार

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखा दुखाचा बेपार

अरे संसार संसार
असा मोठा जादुगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्यावरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा इसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार

-बहिणाबाई

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates