मन वढाय वढाय -बहिणाबाई

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भु‌इवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हडं एव्हडं
जस खसखसचं दान
मन केवढं केवढं
आभायतबि मावेन

देवा आस कसं मन
आस कसं रे घडल
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडल

-बहिणाबाई

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates