गाणं- मंगेश पाडगावकर

को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
ती मनात झुरते आहे,
तुम्ही पहात बसणार.
कल्पनेतल्या पावसात
नुसतेच नहात बसणार !
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट जवळ घेतल्याखेरीज
माणूस नसतं आपलं ...
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं!
शब्द शब्द, रिते शब्द,
त्यांचं काय करणार?
तळफुटक्या माठामध्ये
पाणी कसं भरणार?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं ...
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं!
करून करून हिशेब धूर्त,
खूप काही मिळेल,
पण ’फूल का फुलतं?’
हे कसं कळेल?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
फुलपाखरू झाल्याखेरीज
फूल नसतं आपलं ...
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं!
मातीमधल्या बीजाला
एकच अर्थ कळतो;
कोंब फुटून आल्यावरच
हिरवा मोक्ष मिळतो !!
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आतून आतून भिजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं ..
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज ..
गाणं नसतं आपलं!

- मंगेश पाडगावकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates