फ़ुलपाखरें -ग्रेस

गवतावरची ओंजळभर फ़ुलपाखरे
इकडून तिकडे टाकता येतात.
क्वचित सुखावणारी वारयाची डोंगरशीळ
आली तर नक्की संध्याकाळ झालेली असते.
समोरच्या पितळी खांबात कशाचेही
प्रतिबिंब पडते;
आता सनई सोडूनच्या देवळाचे.

कथेची एक आठवण माझ्या फ़ार जिव्हारी
लागून राहिलीय.
कथाही किती मोकळ्या असतात! नाही?
पाणी शिंपडलेली खूपखूपशी जाईची फ़ुलें
अलगद उचलून ठेवावीत उशीवर;
थोडी उरली तर वेशीवर.
कथेतील पात्र संकटात सापडले म्हणून
धारांनी रडणारी बाई आठवते मला.

संध्याकाळ. फ़ुलपाखरें. गवतांचे अस्वस्थ
आविर्भाव. एकत्र जमून आलेल्या लहरींचे
सूक्ष्म रुप. पितळी खांबात दडलेल्या
रांगोळीच्या वेली. नि:संदीग्ध अक्षरांचे
खाली वाकुन पाहने;सगळ्या गवतांचीच
फ़ुलपाखरे होऊन जाणें..

भूमीच्या संबंधीचा तर नसेलना आपपरभाव?
ऋतू प्राप्त झालेल्या जोगिणीचा स्वभाव?
आठवून आठवून विरलेला संग इथे
सुटतो, तिथे तुटतो- डोंगरात जमलेल्या काळोखासारखी
पायाशी आलेली फ़ुलपाखरें.
गवत वाढले शरीरावर की आपोआपच
माझाही पालटेल रंग.

-ग्रेस

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates