दु:ख -ग्रेस

१.
निर्वंश समुद्रावरील वाळवंटात उभे
राहिले की मला ऐकू येतात
माझ्या कविता.
एखाद्या प्राचीन साम्राज्याच्या निखालसपणे
खचलेला भूभाग
मावळत्या मिठीतील काळा करंद मोर..
दु:ख सांगितले की हलके होते.
आकर्षक होते जगून दाखवले की.
मरुन दाखवल्यावर
दु:ख मिटते?

२.
स्वप्नलिपी वाचणारया प्रेषिताच्या खांद्यावरुन
ढळलेला पक्षी थेट पडला
तो काळोखातच..
डहाळ्यांवर फ़ार दिवसांच्या सुकलेल्या
चांदण्यांचे तेजस्वी व्रण होतेच
आणि मग उशीरा रात्रीपर्यंत शहरातून
निर्घृण कत्तलीच्या बातम्या
येतच राहिल्या

३.
आवड तरी कशी? दु:खद नक्षीची कविता
प्रिय व्यक्तीचे प्रदीर्घ चुंबन
ज्या खेड्यात प्रार्थना भरत होती
तिथल्या विहीरीचे काळे पाणी;
उशीर झाला म्हणून लिलावात विकलेले
घर. मनाचे आणखी कोणते धर्म असतात?
रडून थकले की सगळेच जीव झोपी जातात.


-ग्रेस

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates