वारा आल्यावर.. -दासू वैद्य

कंपनीच्या गेटवर
कामगारांचे खिसे तपासल्यासारखे
मित्र तपासतात माझ्या कवितेत तुझे संदर्भ,
मी त्यांना समजावतो
पण ऐकत नाहीत
मग मीच त्यांना चहा पाजतो..कटवतो
आणि चाचपत बसतो जुन्या दिवसांचे खिसे

मला एकदम मान्य
तू अलगद शिरलीस माझ्यात
नकळत मांजर दूधापर्यंत पोहचावं तशी,
तुझं हसणं.. बोलणं.. चालणं..
खूप वेळापूर्वी जिभेवर ठेवलेल्या
पॉपिन्सच्या गोळीसारखा
आपण विरघळून गेलो

हातावर साचलेली खडूची भुकटी
फ़ुंकत जगणारा मी
नवनवीन साबणाबरोबर
पाण्याचा धबधबा कुठून आणू?
चांगल्या चित्रपटातही
दहा मिनीटे हक्कचे म्हणून झोपणारा
तुझ्याशी तीन-तीन तास न कंटाळता
काय बोललो असेन?
बोलता-बोलता अंधार व्हायचा
पण शब्दांचे पाय कधी घसरले नाहीत

आपल्या शब्दांची टरफ़लं
अजूनही कधी-कधी उडतात
वारा आल्यावर..

-दासू वैद्य

1 comment:

 
Designed by Lena