पाणवठ्यावरच्या बायकांप्रमाणे-दासू वैद्य

प्रत्येक कविता लिहीताना
मला वाटतं
कुठल्यातरी देशात
कुठल्यातरी भाषेत
नक्कीच अशी कविता लिहून झाली असेल,
मग मी नवीन असं काय लिहीणार
तरीही स्वत:ची आदळ आपट करीत
शाळकरी पोरासारखे शब्द गिरवत राहतो,
खोप्याबाहेर तोंड काढून बघणारया
पिलासारखी एक आशा असते,
कधी ना कधी
या सारख्या चेहरयाच्या कविता
एखाद्या कविसंमेलनात
अचानक एकमेकींना भेटतील,
ओळखीचं हसतील,
कविता वाचन संपल्यावर कवीलोक
मानधनाचं पाकीट सांभाळत
फ़ेसाळलेल्या ग्लासासमोर खिदळताना,
या सगळ्या सोशिक कविता
बाहेरच्या पायरयांवर बसून
एकमेकींचे हात हातात घेऊन
सुख-दु:खाचं बोलतील

पाणवठ्यावरच्या बायकांप्रमाणे

-दासू वैद्य

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena