आम्हीच आपले- दासू वैद्य

वेल उजवीकडे वळली काय
आणि डावीकडे वळली काय
तिला नसतात ’डावे-उजवे’
असले तकलादू संदर्भ

लाल मातीत जन्मली म्हणून
झाडे होत नसतात श्रेष्ठ,
काळ्या मातीत
जन्मणारया झाडांनाही
लाथाडण्याची प्रथा नाही,
पावसाला मज्जाव नसतो
कोणत्याही प्रदेशात,
रस्ता भेद करीत नाही
पावला पावलात

लतादीदीच्या गाण्यात
दिसलेत का कधी
गर्वनिष्ठ भगव्या रंगाचे तरंग,
का कोणाला ऐकू आलेत
झाकीर हुसेनच्या तबल्यातून
स्वार्थी मझहबचे संकुचित शब्द

तरीही
आम्हीच आपले
एंव..तेंव,
तुझं..माझं
ढ्यॉव..ढिश्यॉव
गाय..डुक्कर
...

-दासू वैद्य

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates