खडक- अरुण कोलटकर

खडकामधला सार्वभौम घनतेचा
अनावर अश्व खिंकाळतो
जसा शून्याचा स्वार
हाणतो लोखंडी टाच,
अद्वातद्वा धावतो
खडकांच्या धमान्यांमधून
पण फ़ेसाळून काबूत येतो

या खडकाचे
मी बघतो आकाश
अंग चोरताना
जसा या छिन्नीला
पहिला कोंभ फ़ुटतो
रितेपणाचा

बघतो या खडकाचा अंधार
हनुवटी चोळत पळून जाताना
भोवंडून बेभान झालेला
छिन्नीची बाही वरती सरकून
जसे उघडे होते
रितेपणाच्या वसंताचे दणकट मनगट
आणि पहिला कराल गुद्दा
दीप्तिमान होतो
अढळपद मिळवून

आघातांचे तेल पिऊन
चेतलेला पलिता
छिन्नीचा घेऊन
मी पहातो
या निर्वाणीच्या गुहेचा
खरा आकार
आणि खग्रासपणा

पहातो गुहा ही
उफ़ाडयाची होताना
धमन्यातील रात्रीमध्ये
(त्या खडकाच्या)
चांदणी ठसठसताना

-अरुण कोलटकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates