अजून पाण्यावरही आलो नाहीय ....फुगून - किरण येले

तर
एकदा जेवत होतो आणि
कंटाळाच आला एकदम अचानक
ती पहिली वेळ
मग एकदा पावसात फिरताना तिच्यासोबत चिंब
किनारयावर पारदर्शी तिनं
वेळावून पाहिलं मान सूचक आणि
कंटाळाच आला एकदम
मग एकदा पिक्चरला आवडीच्या बसलो
आणि नामावली सुरु झाली तर नांव दिसलं
कुठेतरी
आणि कंटाळाच आला एकदम
मग एकदा प्रमोशनची बातमी आली
तस सगळे मागू लागले पेढे आणि
कंटाळाच आला एकदम
मग एकदा रस्ता क्रॉस करताना अचानक
कंटाळून थांबलो जागीच तर
करकच्च ब्रेक सोबत करकच्च शिवी आणि
फ्रेशच झालो एकदम
मग दुसऱ्या दिवशी
स्वीमिंग पूल मध्ये सूर मारताच
सैलसर चड्डी निघावी तशी
फिट्ट न बसणारी
निघून गेली एनर्जी सरसरत वर
मग हात मारलेच नाहीत कंटाळून
बांधल्यासारखेच झाले आणि
जात राहिलो तळाशी कंटाळून
ओले फक्त कपडे राहिले वर एनर्जीटिक
म्हणून तुम्ही आता पाहताय
ते फक्त माझे कपडे
तुमच्या पुढ्यात फडफडणारे
खर सांगतो मी तिथच तळाशी पडून आहे
कंटाळ्याच्या दगडाला बांधलेला
अजून पाण्यावरही आलो नाहीय ....फुगून

-किरण येले

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates