पूर- पुरुषोत्तम पाटिल

भाळावरची उद्धट बट
दोन बोटांच्या चिमटीत धरुन
अपरया नाकाच्या शेंड्यापर्यंत ताणीत
तू म्हणालीस..
ते मी ऐकलं नाही
मी फ़क्त पहात होतो- चित्र

झटक्यात
बटा सावरीत, कोरे नेसू आवरीत
तू उठून उभी राहिलीस
चाळवीत स्वत:ला
नव्या वस्त्राला, सळसळत..
मी पहात नव्हतो
मी फ़क्त ऐकत होतो- सळसळ

जाताना 
पाठमोरी वळून
भडभडून अल्लड म्हणालीस,
’ इतकी तब्येत बिघडलिये
बांनाच सांगत्ये’
मी ऐकत नव्हतो
नव्हतो पहात
फ़क्त वाहत होतो- पुरात.

-पुरुषोत्तम पाटिल

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates