पालवी- अरुण कोलटकर

परंपरा
आ‌ई आहे आपली
सर्वांचीच

कबूलाय
तिच्या पोटातच आपण वाढलो
मानतो मी

पण बाहेर आलो
की नाळ तोडावीच लागते
की नाही?

जन्मभर ती
कमरेला गुंडाळून
हिंडायला तर येत नाही?

परंपरा
आ‌ई आहे आपली
सर्वांचीच

तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार

त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्‍सिनचं प्रमाण
कमीजास्त असलं

तरी गोड मानून घेतलं आपण
जन्मभर ते दूध
पुरणार नाही

असं वाटलंवतं कुणाला?

परंपरा
आ‌ई आहे आपली
सर्वांचीच

तिच्याच मांडीवर आपण खेळलो
हागलो मुतलो
मार खाल्ला तिचा

हट्ट केले तिच्यापाशी
रुसलो तिच्यावर
झोपलो तिच्या कुशीत
ती कूस पण एक दिवस
सोडावी लागेल
असंही वाटलंवतं कधी?

वेगळ्याच बिछान्यावर आपल्याला
झोपावं लागेल एक दिवस
भलत्याच एकाद्या बा‌ईच्या कुशीत

असं स्वप्नात तरी आलंवतं कधी?

परंपरा
आ‌ई आहे आपली
सर्वांचीच

पण आ‌ई असली प्रत्यक्ष
म्हणजे सख्खी अगदी
सावत्र बिवत्र नाही

तरी ती मेली
की लगेच तिला स्मशानात ने‌ऊन
आपण जाळतोच की

आजारी असली
तरी शुश्रूषा करतो तिची
पाय दुखत असले तिचे

तर चेपतो पाय
पण मेली
की लवकरात लवकर तिला

घराबाहेर कशी काढायची
हा एकच विचार
सगळ्यांच्या डोक्‍यात असतो

मयत किती वाजता निघणार
आणि कुठून
हाच खरा सवाल असतो

अमरावतीच्या आतेबहिणीला
कळवलं की नाही
मामा येस्तंवर थांबायचं की नाही

खांद्यावर न्यायचं
की शववाहिनी बोलवायची
की हातगाडी आणायची
डेथ सर्टिफिकेट आणलं की नाही
वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही
मजकूर कोण लिहिणाराय

अग्निसंस्कार करायचे तिच्यावर
विधिपूर्वक
की नुसतीच विजेच्या भट्टीत घालायची

भटजीला किती दक्षिणा द्यायची
फोटो एनलार्ज करायला दिला की नाही
किती कॉपीज सांगितल्या

जिथं ती मेली
तिथं तेवत ठेवलेल्या दिव्यात पुरेसं
तेल आहे की नाही

वगैरे वगैरे वगैरे
अनेक प्रश्‍न उद्भवतात
ती मेली की

आणि नंतरही
- कावळा तिच्या पिंडाला
चटकन शिवला की नाही

बॅंकेतलं तिच्या नावावरचं खातं
बंद केलं का

अस्थिविसर्जन कुठं करायचं

पण ती मेली
की बॉडी घराबाहेर कशी काढायची
कुजू लागायच्या आत

हाच प्रश्‍न महत्त्वाचा असतो

पण परंपरेच्या बाबतीत
ती मेली
की नुसतीच कोमात आहे

आणि कोमात असेल
तर ती कोमातच राहणार अशी
कायमची

की त्यातनं बाहेर पडायची
शक्‍यता आहे
हे मोठ्यामोठ्या तज्ज्ञांनाही
सांगता येत नाही
तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चट्‌कन
तयार होत नाही कुणी

आणि याच अवस्थेत ती
जिवंत राहणार असेल
तर तिला अशीच जिवंत ठेवायची

इन्डेफिनिटली
कृत्रिम उपायांनी
(तो सगळा खर्च कुणी करायचा)

की सगळ्या नळ्या काढत्या घ्यायच्या
व जरूर असेल
तर सु‌ईमधून एक सूक्ष्म बुडबुडा

तिच्या रक्तात सोडायचा
याबद्दल निर्णय घेणंसुद्धा
सोपं असत नाही

पण एकादा
एवढा गुरफटलेला असतो
आपल्या आ‌ईत

मातृप्रेम
एवढं तीव्र असतं त्याचं
की त्याला हे सहन नाही होत

आपल्या आ‌ईचं हे असं मरणं
घराबाहेर जाणं
आपल्याला सोडून

आ‌ई मेली
हे कबूलच करत नाही तो
आणि कुणाला सांगत-कळवत पण नाही

तिचं मढं
तसंच घरी ठेवून देतो
त्याला वास यायला लागला तरी

किंवा जास्त हुशार असला
तेवढं कौशल्यही असलं त्याच्यापाशी
तर त्या मढ्यात पेंढा भरून
हिचकॉकसाहेबांच्या
सायकोमधल्या
अँथनी पर्किन्सप्रमाणं

तिला झोपवतो रोज रात्री
बिछान्यात तिच्या
मस्तपैकी रज‌ई बिज‌ई अंगावर पांघरून

उठवतो सकाळी
वेणीफणी करतो तिची
गप्पागोष्टी करतो तिच्याबरोबर

तासन्‌तास
तिचा आवाजसुद्धा स्वतःच काढून
स्वतःशीच बोलत कधी खेकसत स्वतःवर

कडेवर घे‌ऊन हिंडवतो तिला घरभर
या खोलीतून त्या खोलीत
जिन्यातनं खाली वर

रॉकिंग चे‌अरवर बसवून ठेवतो तिला
तळघरात
तिच्या अंगावर छानपैकी शाल घालून

कुठचीही तरुण
आणि अगदीच अप्सरा नाही
पण दिसायला बरी

आणि मुख्य म्हणजे पेंढा
न भरलेली
अशी बा‌ई बघितली त्यानं

की त्याच्यातली आ‌ई
खवळून उठते
ही बया ही शिंदळ ही रांड

आता आपल्या सोन्याला
अळुंचो मळुंचो करणार

आणि आपल्याला कचऱ्यात काढणार

या भीतीनं

आ‌ई लोणचं करते
त्या रांडेचं
स्वैपाकघरातली एक सुरी घे‌ऊन

तिच्या भोंदू शरीरात
चिरंतन पेंढा नसून
दुसरा कसलातरी द्रव पदार्थ

भडक रंगाचा व चिकट
ओतप्रोत भरलाय
हे सिद्ध करून दाखवते

ती एक उभं तळं आहे
रक्ताचं
त्वचेनं आच्छादलेलं

आणि तिला कुठंही भोक पडलं
कापलं
किंवा भोसकलं

की त्यातनं या एकाच कंटाळवाण्या पदार्थाशिवाय
दुसरं काहीच बाहेर येत नाही
ेहे आपल्या लाडल्याला दाखवून देते

बंद जागेत कोंडलेल्या
पाकोळीप्रमाणं
सुरी सैरावैरा भिरभिरते

शेवटच्या सीनमध्ये
चिरंजीवांना
वेड्याच्या इस्पितळात ठेवलेलं असतं

जिथं बाळकोबा
आणि मातोश्री
संपूर्णपणं एकरूप झालेले असतात

अँड देन दे लिव
हॅपिली
एवर आफ्टर

- अरुण कोलटकर

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena