राधा:मागे उरलेली- अरुणा ढेरे

ज्याच्यावर निरवलेलं असतं स्वतःला
ते आपलं माणूस एकदाही मागे वळून न पाहता
निरोपाची काडी ओढून निघून जातं
तेव्हा उठणाऱ्या धगधगत्या जाळात
सुक्याबरोबर कितीतरी ओलं चुपचाप जळत राहत.

सर्वस्वाचा नाद गुंजत ठेवणारा
उभ्या जन्माचा वेळू बघता बघता राख हो‌ऊन जातो;
होरपळून मरतात निळ्याभोर सुखाचे मोर
आणि पाण्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर
सर्पाच्या फण्यासारखा जाळ उठतच राहतो.

काजळी पसरत राहते भवतालभर
वंचनेची जळजळ कितीक काळ तगमगत ठेवते;
चुरचुरत राहतो येणारा क्षण अन क्षण;
करपल्या प्रहरांची नुसती आग आग होत राहते

आता पुन्हा परतून ये‌ईल का उभं करता
त्या जुन्या आयुष्याच्या गोकुळाला?
कि क्षमेने तुडुंब भरलेले एखाद नातं
अनयाच्या समजुतीन पाझरत राहील जळत्या जीवावर
तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर?

-अरुणा ढेरे

1 comment:

  1. अवंती, थॅंक्स अ लॉट इतक्या सुंदर कवितेची ओळख करुन दिल्याबद्दल. :)

    ReplyDelete

 
Designed by Lena