यह मरतबा-ग्रेस

यह मरतबा बुलंद मिला जिसको मिल गया
हर मुद्द‌ई के वासते दारो रसन नही

असे वाटते मृत्यू असतो सख्या रे
सतीच्या खुनासारखा पोरका
जळाच्या भयाने दुभंगून गेली
सुन्या स्वप्नपारावरी द्वारका

समुद्रावरी मी तुला एकदा रे
दुपारीच वाळूत ओवाळिले
मला शोधणारी रडे अंध विधवा
जिचे गर्भ माझ्या घरी वाढले

तुझा मंद पावा तुझी दीर्घ राने
तुझी ज्ञानदेवीय जी आर्द्रता
तिच्या सावलीचे निळे चंद्र माझी
पुन्हा मागती का मला संहिता

असा एक सूर्यास्त अंगावरी ये
मला वाटते मीही भारावलो
दिवेलागणीच्या तुझ्या खिन्न वेळीच
हा गाव सोडून मी चाललो

कुणाला म्हणावे तुझ्या मेघमाळा
मला चिंब हो‌ऊन रे दाखवा
जुन्या वैष्णवाने घरी आणल्याना
मला शैव समजून या पादुका

-  कवी ग्रेस यांनी कवी आरती प्रभू यांच्यावर केलेली कविता

1 comment:

 
Designed by Lena