जे दिलं जातं ते - मनोहर ओक

जे दिलं जातं ते घे - घेता आलं तर. मागू नको.
मागण्यात माणसं अवघडतात.
आणि इथे खोटेपणाला वाव आहे.
करता आलं तर कर - साधलं तर, मुद्दामहून नको.
लादण्यात परस्पर दु:ख येतं
आणि इथे फसगतीला शिरकाव आहे.
सुख हे असं अनायास सरगळतीत आहे, असतं
throw yourself in the oblivion, care not.
आग्रह आणि निग्रहात दरवाजे बंद होतात,
हे ध्यानात धर - सुटे भाग कुठं बाहेर पाहू नको.
आशीर्वादाचे फणे, भिकेची उघडी तोंडं;
भलं करण्याचे भलते फंद नाहक छंद समज.
चांगलं करण्याचे उपद्व्याप फशी पडतात;
एवढंच नाही, अंगलटीस येतात हे जाणून वाग.
आहेस तसा कुठेही जा, इतरांच्या पळवाटा बंद होतात.
उसण्याची मागणी बरी नाही;
ह्यांना आंतरिक हेतू आडवसा होतात, आडोसे घेतात.
एकांताचाही आडोसा नको, तोही एक शृंगार आहे.
पश्चात्तापाची भरपा‌ई लांच्छनास्पद.
गुन्हा चूक; कबूली, दुजोरा दे‌ऊ नको

- मनोहर ओक.

1 comment:

  1. खूप वर्षांनी सापडली कविता
    'आयत्या कविता' इतर कविता शोधतोय

    ReplyDelete

 
Designed by Lena