पाहुणा- अरुण कोलटकर

जाग आल्यावर सकाळी
बाजूला सारावं पांघरूण

तेवढ्या सहजतेने त्यानं
अंगावेगळं केलं मरण

उशाशी ठेवून दिलं नीट
घडी घालून

आणि निघून गेला तो इथून
आपल्या वाटेनं

रात्रभर जिचा
पाहुणा होता तो

आणि जी एका स्वप्नात
गुरफ़टलेली होती अजून

देवदूतांच्या
व धरणीकंपांच्या

त्या गुहेची झोपमोड न करता
व निरोपही न घेता

-अरुण कोलटकर

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena