कृष्ण- अरुणा ढेरे

तुला नाही सूर्य झाकता आला
आणि घूँघट ओढून अंधार झाला ,असा देखावाही नाही करता आला
राधे ,तुझ्या चेह-यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली - मुकी कासाविस संध्याकाळ.,
आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला ...वणव्याचा केशरी जाल

अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं
बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एक निरोप घेण्यानं..
हात हललेला तू पाहिलास !
रथ चाललेला तू पाहिलास!
पण खिळून राहिलीस ठायिच,  नाही धावलीस मागे आवेशानं..

कळलं न तुला
शेवटी मनापासून मन दूर जातं
तेंव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो ..
ना अंगाचा वास ,ना शपथांचा फास
श्वास अडतो की घुसमटतो याचा विचार ही नसतो, जाणा-याच्या मनात .
काल होते हात हातात , आज नाहीत .
संबंधाचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितित .

हवं ते हवं तेंव्हा घेतो तो , मिळवतो , खेळवतो , मालावतो .
त्याच्यातून त्याच्याचसाठी उगवतात स्वीकार ..नकार
जग त्याच्याभोवती तो सहज वळवतो

त्याच्या ओळखी‌आड असते एक अदय अनोळख
तो यमुनेच्या जळात कधी कान्हा हो‌उन हसतो ..
तर कधी कालिया हो‌उन डसतो ..
राधे,, पुरूष असाही असतो ...

-अरुणा ढेरे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates