दुपार- सदानंद रेगे

माथ्यावरती उन्हे चढावी,
पावलात सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या,
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या..

डोंगर व्हावे पेंगुळलेले,
पोफळबागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती,
तहानलेल्या मैना याव्या..

लुकलुकणारे गोल कवडसे,
निंबाच्या छायेत वसावे
खारीचे बावरे जोडपे,
बकुळीखाली क्षणिक दिसावे..

कुरणाच्या हिरवळीत ओल्या,
ऊन हिरवे हो‌ऊन जावे
कुठे कधीचे नांगरलेले,
शेत पावसासाठी झुरावे..

-सदानंद रेगे

1 comment:

  1. खूपच सुंदर कविता आहे हि... :)
    शाळेमधल्या जुन्या गोष्टी ताज्या झाल्या!!!

    ReplyDelete

 
Designed by Lena