सतरा.- सलील वाघ


काही पानगळीची
काही पानगळ थांबलेली
वसंताच्या रस्त्याला लागलेली
वस्तुमानाची वाटणी वेगळी
प्रत्येक झाडात फांद्यांना खोडांना
पानांना
तसंच माझं इथं आहे
प्रत्येकात प्रत्येकात माझी
गुंतवणुक आहे वर्मी
ठक्क आकाशावर ठिण्ण चांदण्यांवर
शुकशुकाट दिव्यांवर
अपरात्री पसरलेल्या मैदानांवर
माणसं घरोघर गेल्यावर
आणि कोणत्यापण रस्त्यांवर
माझा जीव आहे वर्षांवर महिन्यांवर
प्रसंग कट्टे ओळखी आठवणी
आजुबाजुच्या झुडपाकुंपणाला
मंद फासलेले कडुलिंबाच्या
मंजिऱ्यांचे वास शिवाय
मोगऱ्याचेही सहनशक्तिपलिकडचे
घणाघाती घणाघाती
माझे अवयव आहेत ते
मला फुटलेले
मी त्यांना आपलं मानतो
शिवाय त्यांना मी मजकुराची
विरामचिन्हं मानतो
धाव घेतो एका विरामचिन्हाकडुन दुसऱ्या
प्रत्येकाकडुन उचल घेत
धाव घेतो धाव घेतो
उफाळुन धडपडत
गोळा करतो फेकतो गोळा करतो
माझ्या संज्ञेची खांडोळी वारंवार

धाव घेतो एका विरामातून
दुसऱ्या विरामाकडे
प्रत्येकात असतो वेग
कोंडिस्त
माझ्या अस्तित्वाचा स्फटिक
पदोपदी विरघळतो धारण होतो त्यात
निकरानी. तगमगत. मंत्रमुग्ध.

पण हवं ते मिळायला
धूळप्रमाथी पश्चिमवारा इथं ये‌ईल
तेंव्हा मी सगळ्या इथून
हायसा झालेलो असीन
माझ्यालगत बिलगुनही
अनोळखी देशात
अस्तित्वप्रमेयाची दणकट चौकट फोडून
अज्ञाताच्या अमानुष प्रांतात
फारतर माझा लवलेश
आणि मागमूस इथं उरणार
कवितांमधुन ठाय लयीत

कवितांमधून ठार लयीत
एकदा मला एक कोणतंतरी
फूल सापडलं होतं म्हणजे
ऍक्चूली फूल असं नाही
फुलासारखंच काहीतरी
ते मी तुझ्याकरता
दोनशेपानी वहीत
जपुन ठेवलवतं फार
हमसाहमशी. तू दिसताक्षणीच
शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं
मी तुला कसं कळवू कायम ठेवू
कवितेत्‍नं
माझी अस्तित्वमुळं थेट पसरलेली
माझ्यापासून जैविक शरीरानी
माझ्या उंचीत रंगात चणीत श्वसनशैलीत
रक्तगटात वीर्यपेशींत घटकात एकीकडे
माझ्या इतिहासभूगोल मूल्यांत
परंपरा सणासुदी मानस-विश्वात
एकीकडे मी आत्मसात करतो
अभिव्यक्त करतो त्या जाणीवांच्या
अंतरिक्ष खगोलात. ददातीत. शोषात.

अगदी एकूण‌एक एकूण‌एक
आणि तू तरी वेगळी कशी
तुझी सुद्धा अस्तित्वमुळं
वेगळी तरी अशीच थोड्याफार फरकानी
अशीच गेलेली सर्वकडे.....
अस्तित्वाचं केवलमूल्यं
व्यवस्थेच्या कालावधीच्या
जागतिक ना‌ईलाजाला खिळलेलं
माझ्यासारखंच एका मनुष्याचं माणसाचं

या सगळ्या पाळामुळांचे भानांचे
उंबरे ओलांडून
कसं जाता ये‌ईल
क्रांतीमान उजाडणाऱ्या भाषांमध्ये
नको असलेल्या संदर्भांना धाशा दे‌ऊन
तुझ्यापुढं निमिषात कसं हो‌ईल
माझं रूपसर्जन कवितेत्‍नं आणि -
परिक्रमेचं परिमार्जन खडानखडा?
त्यातून शिवाय हल्ली तर मी
मलाच आवडेनासा आहे
माझ्या खुनशी नजरेपास्नं
नेटानी लपवतो मी स्वत:ला
पण एक दिवस असा येणार
आणि खडसावेल मला परखड
म्हणून मी अगोदरच सगळ्या
सगळ्या संवेदना दोलायमान
पाजळून घेतोय
मांज्रीसारख्या
ह्यावर त्यावर
ओक्साबोक्शी


- सलील वाघ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates