कुणाच्या वेदना- शरच्चंद्र मुक्तिबोध

कुणाच्या वेदना सांठून सांठून

उरांत माझिया दाटून राहती?


कुणाची आंसवे वाहून वाहून

कपोली माझिया सांडून वाळती?


कुणाच्या रक्ताची संतप्त धारा ती

माझिया प्राणास फोडून वाहते


कुणाची दुर्दशा, तक्रार मूकशी

रात्रींत वक्षास सारखी कापते?


केवढे ओझे हें |  वाकलों खालती

कांपती थरथर माझी ही पाउले


कुणाचें पाप हे खद्खद् हांसत

माझिया मस्तकी चढून राहीलें?


कुणाचा आग्रह चालवीले पुढे?

साक्षात निशेस घेतलीसे शिरीं


प्राणान्त करीत वेदना अत्यंत

प्रेरणा अजस्र शक्तीचीच परी


कोणत्या? चालवी पुढेंच पुढे ती

कशाने येतसे मृत्यूंतही धीर?


निशेच्या मस्तकीं विराट उज्ज्वल

चरण ठेवीत कोण ये अधीर?


-शरच्चंद्र मुक्तिबोध

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena